आठ दिवसांत उखडला परिंचे येथील नवीन रस्ता

  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 3 कोटी खर्च

परिंचे  – येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेला रस्ता आठ दिवसांत उखडला आहे. परिंचे ते हरणी रस्ता निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
2018-19 मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून परिंचे ते हरणी या सहा किमी अंतराच्या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरकरणासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पावसात या रस्त्याचे डांबरीकरण्यात करण्यात आल्याने हाताच्या बोटांनी रस्त्यावरील डांबर निघत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी दाखवले. रस्त्याच्या कडेला गटार व्यवस्था नाही. पावसाचे पाणी जाण्यासाठी टाकलेल्या नळ्या मातीत गाडल्या गेल्या आहेत. रस्त्याच्या साइडपट्ट्यांना रोलिंग केले नाही. यामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
या रस्त्याचे काम निकृष्टपणे सुरू असल्याचे समजताच पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हेमंतकुमार माहुरकर, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मयूर मुळीक यांनी ग्रामस्थांसह या रस्त्याची पाहणी केली आहे. परिंचे गावातील रस्त्यासह तालुक्‍यात अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप पुष्कराज जाधव यांनी केला आहे. यावेळी यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल जाधव, डी. सी. जाधव, अविनाश गुरव, सुरेश जाधव, संजय जाधव, स्वप्निल जाधव, श्रीपाद गुरव, सुजित जाधव, श्रीपाद सोळसकर, विजय जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

येत्या दोन दिवसांत या कामाची पाहणी करणार असून ठेकेदाराला रस्त्याचे काम पुन्हा करण्यास सांगण्यात येणार आहे.
प्रशांत पवार, शाखा अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

Leave A Reply

Your email address will not be published.