आठवण: वेळेची किंमत  

नीलिमा पवार 
कालच भाऊकाका माझ्याकडे पुन्हा आले होते. एका आठवड्यात दुसऱ्यांदा. की गोष्ट जरा दुर्मीळच. नाही तर महिना महिना त्यांचे येणे होत नाही. ते यावेसे वाटत असले तरीही. आज त्यांचा मूड चांगला होता. “”बाळा, चहा कर मस्तपैकी. आले पण घाल बरं का, थोडेसे, असले तर.” मला बरे वाटले. नाही तर चहा आणि त्यांचे काही फारसे सख्य नाही. त्या दिवशी, म्हणजे रम्याला पोलीसांनी पकडले होते त्या दिवशी त्यांचा मूड फारच बिघडलेला होता. त्यांना साऱ्या जगाची चिंता, पण मी काही तो विषय पुन्हा काढला नाही. त्यांना छानपैकी चहा दिला आणि म्हटले, “”भाऊकाका आज जेवूनच जा. काही घाई नाही ना.” भाऊकाका हसले आणि म्हणाले, “”अगदी आनंदाने. मला काही घाई नाही आज. नाही तरी आमच्या सारख्या वृद्धांना, आजच्या भाषेत बोलायचे तर ज्येष्ट नागरिकांना वेळच वेळ असतो.”
त्यांनी शांतपणे चहा घेतला आणि रिकामा कप टीपॉयवर ठेवत ते म्हणाले, “”वेळावरून आठवण झाली. आम्हाला खरंच बराच वेळ मोकळा असतो. तो आम्ही काहीतरी कारणी लावण्याच प्रयत्न करत असतो. पण आजच्या तरुण पिढीला मात्र वेळेचे महत्त्व राहिलेले नाही असे एकूण दिसत आहे.” “” का? काय झाले?” मी विचारले.
“” अगं, मी जाता येता बघतो, ही तरुण पिढी सतत त्या मोबाईलमध्ये अडकलेली असते. घरी दारी, प्रवासात, अगदी जेवताना सुद्धा त्यांच्या हातात मोबाईल असतोच. जणू पाच बोटांबरोबर मोबाईल हे सहावे बोट चिकटलेले आहे त्यांच्या हाताला. काय एवढे बघत असतात देव जाणे. जाता-येताना बसमध्ये मी बघतो. बहुतेक सर्वांच्या हाती मोबाईल आणि कानाला ईयरफोन असतात आणि प्रत्येकजण आपल्याच विश्‍वात हरवून गेलेला असतो. आजूबाजूला काय चालले आहे, काय नाही याची सोडा, आपल्या शेजारी कोण येऊन बसले आहे याचीही खबर नसते त्यांना, अगादी जेवातानासुद्धा हातातला मोबाईल आणि कानाचा ईयरफोन सुटत नसेल त्यांच्या.”
“” जाऊद्या हो भाऊकाका.” मी म्हटल,.”” असते एकेकाला आवड.” पण किती? ते उसळून म्हणाले. रात्रंदिवस तेच. घरात आईवडिलांशी, भावंडाशी बोलायल फुरसत नाही. आणि त्या मोबाईलवर साऱ्या जगाची खबर घेत बसतात. ज्याचे काही देणे घेणे नाही अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतात..टाईम इज मनी हे आजचे जग विसरत चालले आहे. निदान सामान्य माणूस तरी विसरत चालला आहे, किंवा त्याला ते विसरायला भाग पाडले जात आहे.
वेळेचा सदुपयोग ही गोष्टच कालबाह्य होत चालली आहे. हा मोबाईल-विशेष करून स्मार्ट फोन आला आणि सारे बिघडून गेले बघ. संपर्क साधण्यासाठी, खुशाली विचारण्यासाठी, प्रत्यक्ष भेटता येत नसेल तर अशी भेट घेण्यासाठी ते साधे मोबाईल खूप चांगले होते. हे स्मार्टफोन म्हणजे सारी मायावी दुनिया झाली आहे. काय म्हणतात, त्या आभासी विश्‍वात तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर हरवून चालली आहे हे पाहून वाईट वाटते. हा स्मार्ट फोन म्हणजे एक व्यसन झालेले आहे. आणि तो अनलिमिटेड टॉकटाईम,. रोज दीडदोन जीबी नेट हे सारे बिघडवण्याचे-वेळ वाया घालवण्याचे उद्योग आहेत. यात देशाची हानी होत आहे.
परवा मी कोठे तरी, मला वाटते “प्रभात’मध्येच वाचले की गेल्या तीन महिन्यांत जगभरातील लोकांनी 8500 कोटी तास व्हाटऍप वर खर्च केले, 3000 कोटी तास फेसबुकवर खर्च केले. की उधळपट्टी नाही का, आपल्याकडे ही व्हाटसऍप आणि फेसबुकवर तासनतास वाया घालवणारे आहेतच की. तो वेळ सत्कारणी लावला तर? देशाची प्रगती नाही का होणार? पण ते कोणाला नको आहे. कसल्या कसल्या साईट बघत बसतात हे लोक. अर्थात त्याचा चांगला उपयोग करणारे आहेत, नाही असे नाही, पण त्यांचे प्रमाण अगदी नगण्य.
हे मोबाईलचे एक व्यसन आणि दुसरे क्रिकेटचे. ते क्रिकेटचे सामने पाहणंयातही किती वेळ वाया जातो याला काही सुमार नाही. आणि आता तर वर्षभर समने चालूच असतात. ते नसले,तर आयपीएलची सर्कस आहेच. नेमक्‍या परीक्षेच्या काळातच होतात हे सामने. सर्वसामान्यांना मूर्ख बनवून त्यांच्या खिशावर डल्ला मारून कोणा परक्‍या खेळाडूंना कोट्यवधी रुपये वाट्‌ण्याचे कसले कौतुक? ” बोलता बोलता भाऊकाका थांबले.
माझ्याकडे बघून हसले. म्हणाले, “”कंटाळलीस ना? पण वेड्या मनाला राहावत नाही बघा. आमच्या वेळी टाईम इज मनी असे सांगायचे. आता ते दिवस गेले. जाऊदे. जेवायला काय करणार आहेस? मस्तपैकी भजी कर-कांदाभजी. अणि भरलेली ढोबळी मिरची. खूप दिवसात-वर्षात खाल्ली नाही, तुझ्या हातची,”
मी मनापासून हसले आणि किचनकडे वळले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)