आठवण काढण्याची कला…

गवती चहाच्या मागे असलेल्या पामच्या झुडुपाची एक पात सुगरणीने चोचीत तोडून नेली, तेंव्हा मला तुझी आठवण येत होती. ती आठवण त्या पातीसारखी त्याने तोडली, चोचीत धरून उंच उडत, मिरवत, फडकावत ती दूर कुठे एका फांदीवर नेली, असेच क्षणभर वाटले. मलाही अशीच कोणाकोणाची आठवण उगाच फडकावत ठेवायला, तिच्याकडे दुरून बघायला आवडते. फिल्मी स्टाईल. मग मी वातावरण निर्मिती करायला “बडी सुनी सुनी हैं जिंदगी ये जिंदगी…’ असे गाणे स्टाईलवाल्या कुरवाळलेल्या किंचित न दुःखात लावते. पण मग खरेच सेंटी वगैरे होऊन जाते.

एक टपली मारली स्वतःला. एक आवंढा गिळला आणि एक श्वास घेतला खोल. त्या पामच्या पातीला तो सुगरण समोरच्या नारळावरच्या एका बनत्या-बिगडत्या घरट्याला चोचीने विणत राहिला. ते घरटे दोन चार दिवसांत पूर्ण होईल. मग एखादी सुगरण ते तपासेल. तिला आवडले, तर राहील तिथे काही दिवस. नव्या पिढीच्या पंखात बळ येईपर्यंत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मला असं आठवणीला गुरफटून घेऊन घर बांधता आलं असतं तर? असंही जरा वेळ वाटलं. मग दिवस सरला. दुसरा उजाडला. न उजाडून जातोय कुठे? दिवसाला काहीच चॉईस नसतो त्याच्या आयुष्यात. उगवायचे, मावळायचे, उगवायचे, मावळायचे. बोअर कुठला!

पहाटे गवती चहाची पात आणायला गेले, तर पामच्या कोवळ्या पानांवर दवबिंदू पडलेले दिसले. जरासा वारा आला, तरी ते किंचित हलत असत. हळूहळू ते दव खाली पडून जाई. सगळ्या पाती एकमेकांची भावंडे असल्यासारख्या खेळत होत्या एकमेकांशी आणि वाऱ्याशी. ऊन वाढत जाणार होते. काल ह्या पातीतूनच एकीला कोणीतरी पळवून नेले. तिला एका दुसऱ्याच कोणाच्या घरट्यात बांधून टाकले. जसे भिंतीत गाडावे. त्यावर तो सुगरण एक कुशन तयार करणार आतून. त्यात त्याची पिल्लं खेळणार. पातीचे आयुष्य तर उखडून टाकले नां पण त्याने. ती पात दुरून न उपटल्या गेलेल्या भावंडांबद्दल काय विचार करत असेल? ती भावंडे आपल्या जबरदस्ती तोडून नेलेल्या बहिणीला दूरवर गेलेले, कोणाच्या भलत्याच्याच घरात भिंतीत फिक्‍स करून टाकलेले पाहून काय म्हणत असतील? पामच्या पातींच्या आयुष्यात ज्या झाडावर जन्मलो, त्याच झाडावर म्हातारपण येऊ दे रे बाबा, तिथंच निखळून पडू दे, अशीच प्रार्थना होत असणार.

मलाही असे एक डिव्हाईस हवे आहे. ज्याच्या त्याच्या आठवणी जिथल्या तिथेच जिरवून टाकायचे. जिथे जन्मल्या, तिथेच गाळून टाकायचे. फक्त, असे झाले तर आठवणींची पताका न दुःखात मिरवता येण्याचे सुख चालले जाईल, त्याचे काय? सुखासुखी ीलशपश करून ीरव ीेपस स्टाईलमध्ये ऐकायचे प्लेजर कसे मिळेल? मला ही चैन सोडता येणे कठीण दिसतेय…की मी आठवण काढत, मिरवत बसले आहे…..मला माझी आठवण खरेतर ती ज्याच्या/जिच्या कोणाशी संबंधित आहे, त्या ही पेक्षा फारच जास्त प्रिय आहे. माझे प्रेम माझ्या आठवण काढायच्या कलेवर जास्त आहे.

– प्राची पाठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)