आठवणी कोकणातल्या गावाच्या

गाव गाज देतं. आपल्या माणसांना आपल्याशी जोडण्याची ताकद आणि पुढे त्यांच्या जगण्याशी जोडून घेण्याची उमेद देत तुम्हाला मातीत रोवलेल्या कोवळ्या रोपट्यासारखी सतत गावाकडे परतण्याची आठवण देत राहतं. जे आयुष्यात मिळवायचं आहे त्यापासून भरकटवण्याचा प्रयत्न सगळेच करत असतात. पण तुमच्या जगण्याला आकार द्यायला एखादी उमेदीची झुळूक पुरे असते. मला वाळू फार जवळची वाटते. तसं माझ्या गावाला ना नदी आहे ना जवळ समुद्र. एक नदी बाजूच्या बांद्यात आहे. पण तिच्या काठावर जायला तेव्हा कधी वेळ झाला नाही. पण समुद्राच्या किनारी या ना त्या कारणाने मधून-मधून जाणं व्हायचं. तिथलं खळाळून वाहणारे पाणी आणि त्यावर फिरणारे पक्षी. आजूबाजूला असलेल्या कोळ्यांच्या जाळ्या आणि त्या भोवताली पसरलेला माशांचा वास.

अजूनही खुपदा डोंगररांगांमध्ये असलेल्या माझ्या गावाच्या जगण्याचा मोह झाला तरी महामार्गाच्या कडेला असलेल्या तुलनेने शहरी आयुष्यापेक्षा आमच्या जुन्या घराकडचं रान मला जास्त लुभावतं. त्या घरात काय नाही? नात्यांची गणितं आणि परतफेडीची गणितं नसणारे आपले लोक तर आहेतच. सोबत आज्यांनी आयुष्यभर कमावलेलं सुतगिरणीतलं घरापासून दूर राहणं मला त्या घराच्या भिंतींआड दडलंयसा भास होतो. तिथे लेकरांची काळजी घेत शेती, बागायती राखत दीर, जावा, नणंदा, त्यांची पोरं सारं संसार आणि घरात मोठं असल्याची जबाबदारी वाहत राहिलेल्या आजीच्या कष्टांचे अनेक प्रसंग तिथे अदृश्‍य स्वरूपात नांदतात. तिथे बाबांकडचे अनेक नातेवाईक आहेत. सुटीत आम्ही गेल्यावर आपुलकीने हवं नको ते विचारणारे. गाव जगणारे आणि हसत, रूसत, मायेने तिथल्या मातीत समस्यांच्या चौकटीत स्वतःला सामावून घेतलेले. मला त्यांचं जगणंही महत्त्वाचं वाटतं. गाव, तिथलं राजकारण, त्यावर अधिकार सत्ता राखणं तसं सोपं नाही. अनेक रहस्य पोटात दडवत, ओठांवर हसू दाबत हे सगळे तुमच्या मनाला असं काहीसं भारावून टाकतात की ते कोण वेगळे आहेत असं वाटतच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मला माझा डोंगरदऱ्यात राहणारा कोकण रोज भुरळ घालतो. इथे शहरात जगण्याची उमेद आताशा विझू लागलीये. परतीचे वेध नव्या संघर्षाचे बंध जरी उलगडत असले तरी त्यात गाव एक होऊन उभारावा हीच आशा आहे. काम करावं अशी आव्हाने खूप आहेत. एक दिशा पुढील काही दिवसात ठरवून कोकणाची वाट धरल्याशिवाय काही केल्या माझ्या मनाला स्थिरता मिळेल असे वाटत नाही. खुणावतोय लाल मातीत गडप चिऱ्याच्या भुकटीपासून तापलेला डोंगर. रक्‍ताचाच सडा जणू घामातून ठिबकतोय घाटातील प्रत्येक लहान मोठ्या झरे धबधब्यांमधून.

माणसाच्या कष्टांना सीमा नाही पण चालण्याची वाट ही सतत चालल्याशिवाय पायवाट बनूच शकणार नाही. मलाही असंच नव्या मार्गांवर जाताना नवी पायवाट बनेपर्यंत चालत राहावेच लागेल. अंतर किती चाललो याची गणती ठेवून कशाला करायची आपल्याच अडीनडीचा बेरीज आणि गुणाकार? भागाकार करू नंतर बघू उरलेल्या बाकीची आंदण अशीच उधळून मळवट लेऊन निघूनही जाऊ आपल्या हक्काच्या नभाकडे. मी बाई म्हणून हे मार्ग बदलते राहतील हे स्वीकारता आलंच पाहिजे. कोणताच उंबरा मला त्या आत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. परिस्थिती शतकोत्तर हीच कहाणी या मातीला सांगत आलीय. मलाही हा वसा टाकता येणार नाही!

– नम्रता देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)