आठवडाभर पुणेकरांचे पाण्यासाठी हाल

खडकवासला धरणाच्या तपासणीसाठी पाण्यात आणखी कपात

पुणे – पाटबंधारे विभागाकडून खडकवासला सांडकालवा तसेच धरणाचे पाणी सोडण्यात येणाऱ्या गेटचे काम हाती घेण्यात आल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. परिणामी, महापालिकेस करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात आणखी 15 ते 20 टक्‍के कपात करण्यात आली आहे. हे काम पुढील आठवडाभर सुरू राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यात अर्धा ते एक तास कपात करण्यात आली आहे. धरणाची ही तपासणी मंगळवार (दि.19)पासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरात गेल्या सहा महिन्यांपासून एकवेळ पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे आधीच पुणेकर पाणी कपातीचा सामना करत असतानाच मागील महिन्यात ही कपात 10 टक्‍के वाढविण्यात आली आहे. उन्हाळ्यात शहरासाठी प्रतीदिन 1,480 एमएलडी पाण्याची आवश्‍यकता असताना महापालिकेला दिवसाला 1,350 एमएलडीच पाणी मिळत आहे. त्यामुळे शहराच्या उपनगरीय भागांत पाण्याच्या टॅंकरची संख्या दुपटीने वाढली आहे.

असे असतानाच आता धरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाकडून पालखीच्या आधी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी तसेच गेटची तपासणी करण्यासाठी धरणातील पाण्याची पातळी पाणीपुरवठा कराव्या लागणाऱ्या पातळीपेक्षा खूप कमी ठेवावी लागते. त्यामुळे महापालिकेस पुढील आठवडाभर दिवसाला केवळ 1,200 ते 1,250 एमएलडीच पाणी मिळणार आहे.

तर दररोज सुमारे 100 ते 150 एमएलडी पाणी कमी येणार असल्याने महापालिकेकडून शहरात कपातीत वाढ करण्यात आली असून दररोज येणाऱ्या पाण्याच्या वेळेत अर्धा ते एक तास कपात करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले असून शहरात कमी दाबाने पाणी येणार असल्याचे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऐन पावसाळ्यात काम घेतले हाती
खडकवासला धरणातून पावसाळ्यात धरण भरल्यानंतर गेट आणि सांडकालव्यातून पाणी सोडण्यात येते. पावसाळ्यात सुमारे तीन महिने हे पाणी वेळोवेळी सोडण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या तळाजवळ असलेल्या या गेटची तसेच सांडव्याची तपासणी करण्यात येते. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी करावी लागते. त्यामुळे महापालिकेचे पाणी उचलण्यासाठीच्या पाईपला आवश्‍यक असलेला पाणी पुरवठा होत नाही. पण, ऐन पावसाळ्यात पाटबंधारे विभागाने हे काम हाती घेतल्याने पालिकेचीही अडचण झाली आहे. दरवर्षी राज्यात मान्सून 7 जूनच्या आसपास येत असल्याने दरवर्षी मे महिन्यात ही तपासणी केली जाते. मात्र, यंदा जून महिन्याचा दुसरा आठवडा संपल्यानंतर हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाऊस 7 जून पूर्वीच आला असता तर ही तपासणी केली असती का? असा प्रश्‍न उपस्थित होत असून पाण्याच्या वादात धरणाच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष करण्यात आले का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)