आठवडाभरापासून सुरू असणारा माल वाहतूकदारांचा संप अखेर मागे

दिल्लीत बैठक : बहुतांशी मागण्या मान्य केल्याने निर्णय

पुणे – आठवडाभरापासून सुरू असणारा माल वाहतूकदारांचा देशव्यापी संप शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आला. सर्व मागण्या या लेखी स्वरुपात मान्य केल्याने हा निर्णय घेतल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या देशव्यापी संपामुळे बाजारपेठेवर मोठत्त परिणाम झाला. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी केंद्र सरकारने मालवाहतूकदारांना बैठकीसाठी बोलविले होते. याला ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसचे फुलचरण अटवाल, मलकितबल अमृतलाल मदान आणि बाबा शिंदे उपस्थित होते. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत ही बैठक झाली.

मालवाहतूकदारांना देशभरात टोल भरावा लागू नये, अशी मागणी होती. ती मान्य करण्यात आली आहे. यापुढील काळात मालवाहतूकदार ज्यावेळी आपल्या वाहनांचे परवाने नूतनीकरण करतील, त्याचवेळी त्यांच्याकडून एकदम टोलची रक्कम भरुन घेण्यात येणार आहे. काही मालवाहतूकदारांची वाहने या देशभर प्रवास करतात. तर काही फक्त राज्यातच वाहतूक करतात. अशांना टोलची रक्कम ही वेगवेगळी असणार आहे. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तीन आणि केंद्र सरकारचे तीन प्रतिनिधी असणार आहे. ही समिती ही रक्कम लवकरच निश्‍चित करेल. त्याचबरोबर छोट्या वाहतूकदारांना इन्कम टॅक्‍स, ई-बिल आणि जीएसटीमध्ये काही अडचणी व त्रुटी जाणवत आहेत. याबाबत केंद्र शासनाने सकारात्मकता दर्शवित टोलसाठी जी समिती नेमण्यात येणार आहे, ती समिती यातील त्रुटी दूर करून मालवाहतूकदारांना सोयीचे नियोजन करणार आहे.

वाहनांच्या इश्‍युरन्समध्ये सुद्धा 28 टक्‍यांनी वाढ करण्यात आली होती. ती आता 15 टक्‍यांपर्यत आणली आहे. त्याचबरोबर वाहन परवाना नूतनीकरण दरवर्षीऐवजी आता आता दोन वर्षांनी करावे लागणार आहे. या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे.

देशभरात डिझेलचे दर एकसारखे असावेत, ही आमची मागणी केंद्राने मान्य केली नाही. हा प्रश्‍न पेट्रोलियम कंपन्यांच्या अखत्यारित असल्याने त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. पण, येत्या दोन महिन्यांत डिझेलचे दर कमी होतील, असे आश्‍वासन दिले आहे. शुक्रवारच्या बैठकीत सर्वच विषय मार्गी लागले आहेत. त्यामुळे संप मागे घेत आहोत. शनिवारपासून सर्व मालवाहतूक वाहने सुरळीत धावतील.
– बाबा शिंदे, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)