आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे का?

ऑफिसला जाताना स्वरदाच्या हातात छोटी बॅग होती. जाते-एवढे कसे बसे सांगत ती गाडीकडे निघाली. अनघा बघत होती, पण तिने काही विचारले नाही. एक तासाने अनय जेव्हा नाश्‍ता करायला आला तेव्हा तिने त्याला विचारले स्वरदा ऑफिसमधून परस्पर आईकडे जाणार होती व केव्हा परत येणार आहे, ते त्यालाही माहीत नव्हते. तिची अमेरिकेची चुलत बहीण आली होती. शनिवार-रविवार गेट टुगेदर होते. अनघाही जाणार होती.

हे सर्व ऐकल्यावर अनघा काहीच बोलली नाही. हे नेहमीचेच होते. काहीही सांगायचे नाही. बोलायचे ते कामापुरतेच; संवाद कसा नाहीच. अनघाने पण बॅंकेत नोकरी केली होती. कामाचे ताण, धावपळ तिलाही माहिती होती, पण घरात सासुबाई असल्याने त्यांना विचारून सर्व गोष्टी ती शिकली होती आणि करत होती. संसार फुलविण्यासाठी तिने आणि निरंजनने खुप कष्ट घेतले होते. हा बंगला, कार हे सर्व दोघांनी कष्ट करून मिळवले होते. त्यांचा एकुलता एक अनय आणि त्याची बायको स्वरदा असा खरं तर आटोपशीर संसार; पण घरात दोन पिढ्यांमधील अंतर वाढलेले जाणवत होते. अनघा आणि स्वरदा या 40-50 वर्षांपूर्वीची स्त्री आणि एक सध्याची तरुण स्त्री यांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचेकडे बघता येईल. आणि अशा वेळी जाणवते की, “आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे का?’ याचा विचार करताना या दोन टोकांवर उभ्या असलेल्या स्त्रियांचा विचार करावा लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘अनघा’ ही जुन्या पिढीची प्रतिनिधी म्हणताना तिच्या वयाच्या आताच 55 ते 65 वयोगटातील स्त्रियांचा विचार करताना स्त्री खरोखर स्वतंत्र होती का? आणि आहे का? तर नाईलाजाने त्याचे उत्तर नाही असेच असेल. या काळातील स्त्रिया साधारणपणे पदवीपर्यंतचे शिक्षण नक्कीच घेतलेल्या किंवा अधिक उच्च शिक्षण म्हणजे डॉक्‍टर, इंजिनिअर, प्रोफेसर आढळतात. सरकारी कार्यालये, बॅंका, शाळा यामध्ये नोकरी करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभ्या असतात. दिवसभर नोकरी, मुलांचे शिक्षण, घरातील वडीलधारांचे मनाप्रमाणे वागणे, नवऱ्याच्या आवडी-निवडी, त्याचे ऑफिसचे वेळापत्रक, नातेवाईकांशी संबंध जपणे, या सर्व आघाड्यांवर त्या एकाकी पण खंबीरपणे लढल्या. सणावारी अगदी नैवेद्याचे पान वाढूनच मग ऑफिस धावत-पळत गाठण्याची कसरतही अनेकींनी केली. पण हे सर्व त्या आनंदाने करीत होत्या. पण स्वतंत्र मात्र नक्की नव्हत्या.

स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे तरी काय? याचा फारसा विचार या पिढीने फारसा केला नाही. आर्थिक सुबत्ता असल्याने कारण ही संसाराची गाडीची दोनही चाके एकत्र चालत असल्याने किरकोळ वादविवाद असले तरी एकमेकांना सांभाळत संसार पुढे नेत असत. एखाद्या रविवारी नवऱ्याबरोबर तू दमलीस म्हणून बाहेर जेवणाचा बेत आखला तरी खूष होणारी ही पिढी. चार उठून दिसणारे दागिने, मुलांच्या लग्नात घेतलेली पैठणी, स्वत:चे हक्काचे घर, मुलांची प्रगती, नातेवाईकांची मर्जी, ऑफिसमधील चांगल्या मैत्रिणी, शेजारी-पाजारी, या पलीकडे फारशा अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे त्या सुखी होत्या. पण स्वतंत्र नक्की नव्हत्या.

स्वातंत्र्य म्हणजे, मी मला वाटेल तसं वागेन असा अर्थ होत नाही. तर स्वातंत्र्य हे विचारांचे हवे, स्वत:च्या मतांचे हवे, दुसऱ्याने आपला आदर करण्याचे हवे. आर्थिकदृष्ट्या तर मागच्या पिढीतील स्त्री स्वतंत्र होती. पण त्याचा गैरवापर फारसा कधी केला गेला नाही; परंतु आताची तरुण स्त्री खरोखरच स्वतंत्र आहे. स्वतंत्र म्हणजे स्वत:च्या तंत्राने वागणारी. उच्च शिक्षण, चांगल्या पगाराची उत्तम नोकरी, कामाचे 12 तास कमीत कमी, गाडी, महागडा फोन, पार्लरच्या चकरा, फॅशनेबल व उठून दिसणारे कपडे, ब्रॅण्डेड वस्तूंचा वापर, उत्तम गॉगल, चपला, पर्सेस, महागडे सेंटस्‌, क्रेडीट कार्डचा वापर, शनिवार-रविवार बाहेर खाणे, परदेश वाऱ्या या सर्व गोष्टींमुळे आताची पिढी स्मार्ट नक्कीच झाली आहे. हे सर्व स्वत: करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी स्वत:च घेतले आहे, पण यापुढे नातेवाईक, आपले संस्कार, सणवार, रितीभाती, मोठ्यांचा आदर करणे, कोणतीही गोष्ट करताना त्यांना विचारणे किंवा त्यांचा सल्ला घेणे, या गोष्टी त्यांनी सोडून दिल्या आहेत. त्या सर्व दृष्टीने स्वतंत्र विचाराच्या नक्कीच आहेत.

मागच्या पिढीची “अनया’ आणि आताची तरुण “स्वरदा’ यांची तुलना नाही करता येणार. दोघीही कदाचित आपापल्या जागी बरोबर असतील; परंतु स्त्री ही एखाद्या सुसंस्कृत घराचा कणा असते. “अनया’ ने आपले व्यक्तिमत्त्व घडवित, शिक्षण, संस्कार याचा उत्तम मेळ घालीत संसार पुढे नेला. तिची वाचनाची, गप्पांची, प्रवासाची आवड तिने जोपासली. घरातूनही तिला याकरिता कायम पाठिंबा मिळाला. सासुबाई आजही कौतुकाने तिला दर वाढदिवशी साडी घेतात. स्वातंत्र्य ही संकल्पना समजुतीने घेत अनयाने घर आणि स्वत:चे अस्तित्व जपले हाच खरा आदर्शवाद आहे.

‘स्वरदा’ हुशार आहे, सुंदर आहे, कामात निष्णात आहे, तिला डान्स येतो, ती भरपूर ऑनलाईन शॉपिंग करते. पण घरातून आईकडे जाताना नुसते सांगून जाण्याचे तिला सुचत नाही. अनया तिला नक्कीच नाही म्हणणार नाही, याची कल्पना असूनदेखील! मुळात “त्यात त्यांना काय सांगायचे, मी आईकडे केव्हाही जाऊ शकते, ‘अशी विचारधारा आहे. “स्वातंत्र्य’ म्हणजे मी कुणाला विचारून काही करणार नाही असा या पिढीचा समज आहे, पण खरं स्वातंत्र्य कशात आहे ते त्यांना अजून उमगलेलेच नाही. या दोन पिढीतील अंतर कमी करून सामंजस्याने वागण्यात खरे शहाणपण आहे; परंतु बहुतेक ठिकाणी या पिढीतला फरक वागण्यात दिसतोच आहे. स्वातंत्र्याच्या भ्रामक कल्पना मनात असल्याने ही पिढी अतिशय आत्मकेंद्रित, दुसऱ्याचा विचार न करणारी झाली आहे. एखाद्या घरात स्त्रीचा सन्मान जपणं यात खरं स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्याबरोबर स्त्रियांची सुरक्षितता खूपच महत्त्वाची आहे. सुरक्षित, निकोप समाजातील स्त्रियाच या स्वत:चा आत्मसन्मान सांभाळतील तर त्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतील.

– आरती मोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)