आचार्य अत्रे रंगमंदिराचा “मेकओव्हर’

  • लवकरच होणार खुले: नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी – मागील दोन वर्षांपासून रखडलेले अचार्य अत्रे रंगमंदिर लवकरच खुले होणार आहे. रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम हे अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात काम पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळाली.

पिंपरी-चिंचवड शहरातही कला संस्कृती रुजू पहात आहे. मात्र, कलांकाराना शहरात हक्काचे व्यासपीठ मिळत नाही म्हणून वारंवार तक्रार होत असते. त्यातच महापालिकेने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे व पिंपरी येथील अचार्य अत्रे रंगमंदिराचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले. अत्रे रंगमंदिर नूतनीकरणाच्या कामासाठी 24 ऑगस्ट 2017 पासून बंद होते. त्यासाठी महापालिकेने नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, काम रखडल्याने कलाकारांना व नागरिकांना वर्षभराची प्रतीक्षा करावी लागली आहे, अशी माहिती फ-प्रभाग कार्यकारी अभियंता केशव फुटाणे यांनी दिली.

चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणासाठी 1 मे 2018 रोजी बंद ठेवलेले थिएटर नोव्हेंबर 2018 ला कार्यक्रमांसाठी खुले करण्यात आले. मात्र, त्याआधी दुरुस्तीसाठी बंद ठेवलेले आचार्य अत्रे रंगमंदिर सुरु करण्यासाठी उशीर झाल्याची चर्चा शहरात सुरु होती. मात्र, विलंबाने का होईना आता कार्यक्रमांसाठी अत्रे रंगमंदिर खुले होणार असल्याने कलाकारांना प्रयोगासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील आचार्य अत्रे रंगमंदिराची वेगळी ओळख असून, येथे नाटकाची रंगीत तालीम केल्यास यश प्राप्त होते, अशी एक विचार कलाकारांमध्ये आहे. त्यामुळे कलाकार सरावासाठी या रंगमंदिराता पहिली पसंती देतात. मात्र, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, फ्लोरिंग, ध्वनीक्षेपक यंत्रणा, आरामकक्ष, वातानूकुलीत यंत्रणा, व्हीआयपी रुम, सुशोभिकरण या सर्व बाबींची दुरूस्ती करणे अनिवार्य होते. त्यामुळेच रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते.

विशेष म्हणजे, शहरातील रंगमंदिरात प्रथमच सांस्कृतिक पुस्तकांचे वाचनालय सुरू करण्यात येत आहे.या कामामध्ये विद्युतीकरणाच्या कामाला अधिक विलंब लागला. अपेक्षित दिवे उपलब्ध न झाल्यामुळे कामाला उशीर झाला, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.

कामावर भुताटकीचेही सावट
पिंपरी येथील अचार्य अत्रे रंगमंदिराला भुताटकीचेही सावट होते. मार्च 2018 मध्ये रंगमंदिरात पैंजणाचा आवाज येत असल्याची अफवा पसरली आणि कामगारांनी तेथे काम करण्यास नकार दिला. त्यामुळेही रंगमंदिराचे काम हे रखडले होते. मात्र तेथे अधिकाऱ्यांनी पहाणी करून तब्बल महिनाभरानंतर हे काम पुन्हा सुरु झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.