“आघाडी’च्या धर्मानुसार सुळेंना मदत करणार

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका; कार्यकर्त्यांना देणार आदेश

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेस पक्षासोबत विधानसभेला व स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीसाठी सातत्याने आघाडीचा धर्म पाळला जाईल, असा शब्द खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठांसमोर दिला आहे. राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी समविचारी आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने, बारामती लोकसभा मतदार संघाच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्‍यात कॉंग्रेस पूर्ण ताकतीने साथ देईल, अशी ग्वाही राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर येथील अर्बन बॅंकेच्या सभागृहात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व कॉंग्रेसचे मुख्य पदाधिकारी यांनी आज विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.इंदापूर तालुकाध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, माजी सभापती विलासराव वाघमोडे, निरा भिमाचे चेअरमन लालासो पवार, माजी सभापती मयुरसिंह पाटील, इंदापूर दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, उपसभापती देवराज जाधव आदी उपस्थित होते.

माजी मंत्री पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लोकसभा निवडणुकीच्या निर्णयासंदर्भात बैठक घेतली होती. इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने त्रास दिला असल्याने राष्ट्रवादीला मदत करण्याबाबत या बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या. वास्तविक वर्षांपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर पक्षांची आघाडी होण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय झालेला असताना देखील येथील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मित्र पक्षांकडून मदत न होता त्रास होत असतो. परंतु, इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते नेते हा पक्षाचा आदेश मानणारे आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आघाडी धर्म पाळण्याच्या सूचना केल्याने, मी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना समजून सांगितले आहे. या पार्श्‍वभुमीवर बारामती लोकसभेच्या आघाडीच्या म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

  • अजित पवारांनाही लिड दिलेच की….
    लोकसभा निवडणुकीत 2004, 2009 व सन 2014 मध्ये आघाडीचा धर्म पाळत तालुक्‍यातील कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला परिपूर्ण साथ दिली होती. अजित पवार यांनाही लोकसभा निवडणूक लढविली त्यावेळीही इंदापूर तालुक्‍यात तब्बल 82 हजार मताचे लीड देण्यासाठी कॉंग्रेसने मोठी मेहनत घेतली होती, त्यावेळी आता जे पुढारी फिरत आहेत, ते त्यावेळी नव्हते, अशी कोपरखळी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मारली.
  • फक्त खासदार सुप्रिया सुळे यांनाच निमंत्रण…
    इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा दि. 8 एप्रिलला इंदापूर शहरातील शहा संस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी फक्त खासदार सुप्रिया सुळे यांनाच निमंत्रण देण्यात आला आहे. यामध्ये आघाडी धर्म पाळण्यासह विधानसभेकरिताही सुळे यांच्याकडून शब्द वदवून घेतला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.