“आघाडी’च्या एकजूटीचा मोठा विजय

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील; मतदारसंघात कॉंग्रेसने केलेल्या कामाचे यश

रेडा – इंदापूर तालुक्‍यातून आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना 1 लाख 55 हजार मताधिक्‍य मिळाले आहे. तालुक्‍यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या मताधिक्‍यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. कॉंग्रेस पक्षाने इंदापुरात उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन प्रचाराचा प्रभावी शुभारंभ केला होता, त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तालुक्‍यातील प्रत्येक गावात प्रचारार्थ बैठका घेतल्या. तसेच, कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे तालुक्‍यातील जि.प.गटनिहाय मेळावे घेण्यात आले.इंदापूर तालुक्‍यातील गावागावातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अगदी मनापासून आघाडीच्या धर्माचे पालन केल्याने तालुक्‍यात सुप्रिया सुळे यांना मोठे मताधिक्‍य मिळाले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

इंदापूर तालुक्‍यात प्रचार कालावधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या समवेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या एकत्रित प्रचार सभा घेण्यात आल्याने त्याचा फायदा मताधिक्‍य वाढीस झाला आहे. सुप्रिया सुळे यांचे लोकसभेत चांगले काम आहे.आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्न त्या चांगल्या पध्दतीने सोडवतील, असा विश्‍वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, इंदापूर, पुरंदर, भोर तसेच मतदार संघातील खडकवासला, दौंड, बारामती येथिल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्माचे प्रामाणिकपणे पालन केल्याने सुळे यांना अपेक्षित असे चांगले मताधिक्‍य मिळू शकले, असेही पाटील यांनी नमूद केले.

  • हर्षवर्धन पाटील यांचे नियोजन यशस्वी…
    इंदापूर तालुक्‍यात आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी अगदी प्रारंभीपासून हर्षवर्धन पाटील यांनी शिस्तबध्द नियोजन करीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणी मेळावे घेतले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशीही त्यांचा सतत संवाद व संपर्क होता. तसेच, प्रारंभी नाराज असलेल्या काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या हर्षवर्धन पाटील यांनी चार वेळा बैठका घेऊन नाराजी दूर करून प्रचारात सक्रिय केले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनीही प्रचारात स्वतः लक्ष घालून अनेक सभा घेतल्या.त्यामुळे भाजपच्या मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांनी लक्ष दिल्याने इंदापूर तालुक्‍यातून सुप्रिया सुळे यांना चांगले मताधिक्‍य मिळले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.