आगीच्या घटनेची पूर्ण चौकशी होईपर्यंत कंपनी बंद

कामगार राज्यमंत्री भेगडे यांचे आदेश : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये पाहणी

कुरकुंभ- कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीमधील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमधील बुधवार (दि. 14) झालेल्या भीषण आगीच्या घटनास्थळाची पाहणी करून या घटनेची पूर्ण तपासणी व चौकशी होईपर्यंत कंपनी बंद राहणार आहे. कंपनीवर गुन्हे दाखल करणार आहे, असे पर्यावरण व कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शनिवार (दि.17) रोजी एमआयडीसी कार्यालया मध्ये स्थानिक ग्रामस्थांशी भेट घेऊन सवांद साधला,यावेळी ते बोलत होते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतील कंपन्यापासून वायू प्रदूषण व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. काही कंपन्या त्यांचे दूषित रसायनमिश्रित पाणी उघड्यावर सोडत असल्याने शेतजमिनी नापीक बनल्या आहेत. यामुळे स्थानिकांचे नुकसान झाले आहे. संबंधीत प्रशासकीय अधिकारी कंपनी व्यवस्थापनेला पाठीशी घालत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

भेगडे म्हणाले की, कंपनीपेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. भीषण आगीची सखोल चौकशी करून कंपनी व शासकीय अधिकारी दोषी आढळल्यास संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनी बंद ठेवण्यात येईल. पुढील दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन नागरिकांना न्याय देण्यात येईल. गरज पडल्यास मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

रासायनिक पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतजमिनी मालकांना भरपाई देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना देण्यात येईल. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील सर्व कंपन्यांची साठवणूक, उत्पादित मालाची व अपघात प्रवण क्षेत्राची माहिती असलेली माहीती पुस्तिका एक महिन्यांत परिसरातील ग्रामपंचायतीला दिली जाणार आहे. कुरकुंभ औद्योगिक कार्यालयात प्रदूषण मंडळाचे अधिकारी आठवड्यातील एक दिवस नागरिकांसाठी उपलब्ध राहतील.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, तानाजी दिवेकर, राहुल शितोळे, सनी सोनार, मनोज फडतरे, आयुब शेख, विनोद शितोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • आमदार कुल यांच्याकडून अधिकारी धारेवर
    कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अपघात व कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार राहुल कुल यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. जिल्हाधिकारी यांनी संबंधित कंपनी व्यवस्थापनाला प्रदूषणासंदर्भात योग्य आदेश दिले होते. तरी एमआयडीसीमध्ये आगीच्या, अपघाताच्या तसेच प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. आगीच्या घटनांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने आमदार राहुल कुल यांनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×