भांडवली बाजारात निर्देशांक वर्षाच्या सुरवातील सर्वोच्च पातळीवर होता. त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये
निर्देशांकात घसरण पाहण्यास मिळाली. याची नेमकी कारणे काय आहेत व आगामी काळात बाजाराची दिशा कशी असणार आहे याचे विवेचन.
जानेवारी 2018 मध्ये असणारे सर्वोच्च पातळीवरील शेअर बाजार तीन महिन्यातच खाली आला. आपल्या देशात आणि परदेशात घडणाऱ्या घटनांचा थेट परिणाम शेअर बाजारावर होत असतो. आता सरकारी रोख्यांच्या किंमती (गव्हर्नमेंट सिक्युरिटिज् ) जवळपास एक टक्क्याने खाली आल्या, सरकारची धोरणे, चलनवाढीचा दर व त्यामुळे वाढणारे व्याजाचे दर अशी भिती निर्माण झाली. त्यामुळेच सरकारी रोख्यांमध्ये घसरण झाली. शिवाय जागतिक पातळीवर चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार संघर्ष, अनेक विकसित देशांमधील प्रमुख बॅंकांनी व्याजदरात केलेली वाढ, आयात केल्या जाणाऱ्या वस्तुंच्या किंमतीमध्ये झालेली मोठी वाढ इत्यादी अनेक बाबींचा थेट परिणाम शेअर बाजाराच्या घसरणीवर झाला.
शेअर बाजाराच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर मिडकॅप (मध्यम भांडवल असलेल्या कंपन्या) व स्मॉल कॅप (छोट्या भांडवली कंपन्या) यांच्या निर्देशांकात जवळपास 14 टक्क्यांची घसरण झाली. याचवेळी मुख्य निर्देशांक निफ्टी (राष्ट्रीय शेअर बाजार) आणि सेन्सेक्स (मुंबई शेअर बाजार) हे निर्देशांक साधारणतः नऊ ते दहा ट्क्कायंनी घसरले. याचकाळत काही मध्यम भांडवली कंपन्यांचे शेअर 10 ते 25 टक्क्यांनी खाली आल्या. असे असूनही मध्यम व छोट्या भांडवली कंपन्या अजूनही जादाचे अधिमूल्य राखून आहेत. तर काही कंपन्यांचे शेअर आकर्षक भावात उपलब्ध झाले आहेत.
जागतिक पातळीवर सुरु असलेल्या व्यापार संघर्षामुळे भारतीय व्यापारावर कोणताही दूरगामी परिणाम होणार नाही, असे आपल्याला विश्वासाने म्हणता येते. किंबहुना झाला तर भारतीय कंपन्यांना या व्यापार संघर्षाचा फायदा होण्याची जास्त शक्यता आहे. भारतामध्ये आयात होणाऱ्या वस्तुंचे बाजारभाव यामुळे कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपोआपच महागाईचा दर खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे घडत असतानाच याचे परिणाम जागतिक पातळीवर पैशांची तरलता कमी होण्यात व खनिज तेलाच्या भावात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर व शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो.
गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारी रोख्यांच्या भावात झालेल्या घसरणीमुळे रोखे बाजारातील चिंता कमी झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम भांडवली बाजारावर झाला आहे. आर्थिक वर्ष संपताना कंपन्यांनी जाहीर केलेल्या शेवटच्या तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे शेअर बाजारात तेजीचा कल वाढत आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकालांकडे बाजाराची नजर आहे.
गेल्या काही काळात सत्ताधारी पक्षाची विधानसभा निवडणुकांमध्ये व वेगवेगळ्या पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र कामगिरी झालेली आहे. यामुळे भांडवली बाजारातही काही प्रमाणात चढउतार पहायला मिळालेले आहेत. यावरूनच येणाऱ्या काळात होणाऱ्या वेगवेगळ्या विधानसभा निवडणुका व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यांचा थेट शेअर बाजारावर होणार आहे. येणारे वर्ष हे शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या काळात अनेक चढउतार पहावयास मिळू शकतात. परंतु अर्थव्यवस्थेतील ताजे संकेत हे आर्थिक उभारीचा कल सुस्पष्टपणे दर्शवणारे आहेत आणि म्हणूनच आर्थिक वर्ष 2019 मध्ये बाजार अपेक्षेनुसार साधारणतः वीस टक्क्यांच्या आसपास महसुली वाढ दर्शवण्याची शक्यता आहे. तरीही प्रासंगिक राजकीय, अर्थकारणातील आणि जागतिक घटनांमुळे हे मूल्यांकनाचे गणित बिघडू शकते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा