#आगळे वेगळे: रक्षाबंधन सहाव्या वर्षाचे आणि साठाव्या वर्षाचे  

संग्रहित छायाचित्र
अनुराधा पवार 
ताई, राख्या नाही घ्यायच्या का? दुकानदाराने मला विचारले. मी दुसरेच काहीतरी घ्यायला दुकानात गेले होते. राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा आपला एक पवित्र सण भावाबहिणीच्या नात्याला ताजेतवाने करणारा. राखीपौर्णिमेच्या अगोदर तीनचार आठवडे बाजार राख्यांनी भरून जातो. दरवर्षी नवनवीन डिझाईनच्या राख्या येत असतात. अगदी आकर्षक. साध्या रेशमी राख्यांपासून ते सोन्याचांदीच्या रत्नजडित राख्यांपर्यंत (या फक्त सोनाराच्या दुकानातच मिळतात) असंख्य प्रकारच्या राख्या बाजारात येत असतात. त्यात चित्रपटांच्या नावाच्या राख्याही असतात.
मला आठवायला लागल्यापासून म्हणजे किमान पाच दशके झाली आहेत. जास्तच, पण कमी नाहीत. दरवर्षी नवनवीन प्रकारच्या राख्या येतात. अगदी चिमुकल्या राख्यांपासून ते मनगटावर मावणार नाहीत एवढ्या मोठ्या राख्यांपर्यंत आकार असतात राख्याचे अणि गेली काही वर्षे चिनी राख्यांनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. त्याच्या नावीन्यपूर्ण असंख्य व्हरायटीज असतात आणि तुलनेने अतिशय स्वस्तही. मला कधी कधी नवल वाटते, की हा चिनी माल इतक्‍या दूरून येऊन इतका स्वस्त कसा काय परवडतो? जाऊ दे तो आताचा विषय नाही,
खरं तर राखी म्हटले की, साधी रेशमी गोंड्याची राखी ही खरी राखी, भावाबहिणीच्या मायेला बांधणारी, बाकी म्हणजे नुसती फॅशन आणि व्यापार. आता दुकानदाराने विचारल्यावर आठवले, आता राख्या घेण्यासाठी पूर्वीसारखा हुरूप वाटत नाही, पण पूर्वी अगदी पाचदहा वर्षांपूर्वीपर्यंत, राख्या खरेदी करण्याची ओढ असायची जीवाला.
मला अगदी लहानपणचे रक्षाबंधन आठवते अजूनही. मी असेन पाचसहा वर्षांची. मला चार भाऊ. दोन मोठे, दोन लहान. राखीपौर्णिमेच्या चार दिवस अगोदरच माझी आई बाजारातून राख्या घेऊन यायची. चांगल्या दीड दोन डझन. तिच्या सख्या, चुलत, मावस भावांना पोस्टाने राख्या पाठवायला लागायच्या. तेव्हा अगदी भक्तिभावाने पाकिटत राख्या घालून चार ओळींचे पत्र लिहून बरोबर राखीपौर्णिमेला पोहोचतील अशा बेताने ती पोस्टात टाकत असे. त्यात चार अक्षताही टाकत असे. तिचा एक भाऊ मात्र अगदी आठवणीने राखीपौर्णिमेला आमच्या घरी येत असे. आमच्या घरी मग सकाळीच एका रांगेत माझे चार भाऊ, मामा आणि शेजारची दोन मुले राखी बांधण्यासाठी पाटावर बसत.
अगोदर आई सर्वांना राख्या बांधायची आणि नंतर मी. माझ्या हाती निरंजन, अक्षता, हळदकुंकू, सुपारी, चांदीचे नाणे, सोन्याची अंगठी असलेले तबक ती द्यायची, मग प्रत्येकाला अगोदर कपाळाला गंधाक्षता लावून, ओवाळून-त्यापूर्वी कपाळाला सुपारीने, चांदीच्या नाण्याने, सोन्याच्या अंगठीने स्पर्श करून मस्तकाभोवती उलट सुलट फिरवायला लावयची, आणि ओवाळून झाल्यानंतर तबक खाली ठेवून उजव्या हाताच्या मनगटाला राखी बांधून गोड खायला द्यायची. राखी बांधतानाही मला आईची मदत घ्यायला लागायची. गाठ काही नीट बांधता येत नसे मला. तेव्हा ओवाळणी म्हणून भावंडानी दिलेली चॉकेलेट वा रिबनच्या तुकड्याचेही मोठे कौतुक वाटायचे. माझा सर्वात लहान भाऊ खाऊचे पैसे साठवून काहीतरी वस्तू घेत असे माझ्यासाठी.
वय वाढत गेले, वर्षे सरत गेली, मी मोठी झाले, भावंडेही मोठी झाली. शालेय जीवनापर्यंत राखीपौर्णिमेचा आनंद वाढत गेला. मात्र, पुढे त्याला कळत नकळत ओहटी लागली. भाऊ आपापल्या व्यवसायात-संसारात रमत गेले. मी ही माझ्या संसारात रमले, पण भावंडाची आठवण काही कमी झाली नाही. सणावाराला-विशेषत: राखीपौर्णिमा-भाऊबिजेला भावंडांची आठवण येत राहिली. अशा सणांना रेडियोवर हमखास गाणी लागायची-राखी धागों का त्योहार, भैया मेरे राखी के बंधन को निभाना…..अशी गाणी ऐकली की डोळे भरून यायचे, झरझर वाहायचे. वाटेकडे नजर लागायची. त्या दोनचार दिवसात जरा दार खुट वाजले तरी वेड्या मनाला वाटायचे भाऊच आला असेल. पण ते वाटणे हे वाटणेच राहायचे. पुढे अपेक्षा उणावत गेल्या. आता वयाची साठी आली. माझ्या मुली, नाती भाऊबिजेची तयारी करतात. मी त्यांच्याकडे कौतुकाने बघते. त्यांच्या आनंदात आनंद घेते भरभरून.
अजूनही वाटते अचानक एखादा भाऊ दारात यावा दत्त म्हणून आणि मोठ्या उत्साहाने त्याला राखी बांधावी. मस्तपैकी रांगोळी काढावी, रंगीत पाट मांडावा, चांगले औक्षण करावे आणि छोटीशीच पण रेशमी राखी त्याच्या मनगटावर.
आता त्याच्याकडे मागावे असे काहीच नाही. वयाच्या या पडावावर भावाकडे काय मागायचे. अशीच माया उदंड्‌ राहू दे…
याशिवाय बहिणीला काय हवे असते?
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)