आखेगावला अवैध धंद्याचा विळखा

दारुच्या अतीसेवनाने एका युवकाचा मृत्यू
शेवगाव – तालुक्‍यातील आखेगांव येथे मटका, जुगार, दारु व वाळू या अवैध धंदयाला उत आल्याने गावामध्ये अशांतता निर्माण होत आहे. गेल्या आठवडयात दारुच्या अतीसेवनाने एक युवक जीवाला मुकल्याची घटना घडली आहे. या अवैध धंदयामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले असून हे अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी गावातील महिला व ग्रामस्थ करीत आहेत. या संदर्भात ग्रामसभेतही एकमताने ठराव पारीत करण्यात आला आहे.
आखेगाव हे जवळपास सहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. हे गाव पुर्वीपासुनच वादग्रस्त म्हणून प्रसिद्ध होते. गावातील अवैध व्यवसायामूळे गाव बदनाम झाले होते. गावातील तरुण, वयोवृध्द नागरीक जुगार, मटका, दारू या व्यसनांच्या आहारी गेले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे सर्व अवैध व्यवसाय बंद केले होते. मात्र हे अवैध व्यवसाय पुन्हा सुरु झाले आहेत. गरीब घरातले तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याने घरातील वातावरण बिघडले. गावीतल मुख्य चौकात अशी व्यसनाधिन झालेली तरुणांची टोळकी सतत वावरत असतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची व महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार येथे वाढले आहेत. गावामध्ये व्यसनांमुळे अशांतता निर्माण झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत ग्रामपंचायतीने मासिक मिटींग घेवून गावातील अवैध धंदे बंद करण्याबाबत ठराव घेतला.
याबाबत ठराव व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाच्या प्रती ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व महिलांनी पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसिलदार यांना भेटून समक्ष दिल्या. अवैध धंदे करणारे लोक महिलांना दमदाटी करण्याचे प्रकार घडत असल्याने नेमकी या व्यावसायिकांना फुस कोणाची असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत काही व्यावसायिक तर आम्ही पोलीसांना हप्ते देतोय तुम्हाला काय करायचे ते करा अशा शब्दात उत्तरे देतात. गणेश विसर्जनच्या दिवशी तर रस्त्यावर दारू विक्री झाली. दारु सेवनाने तीस वर्षीय तरुणाचा बळी गेला.
ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असुन अवैध व्यावसायिकांची नावानिशी माहिती दिली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास ग्रामस्थ व महिलांच्या वतीने शेवगांव येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)