आई, पत्नी, चिमुकल्या मुलीचा खून करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप

विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांचा आदेश

पुणे – कर्जाला कंटाळून आई, पत्नी आणि सात वर्षीय चिमुकल्या मुलीला झोपेच्या गोळ्या देऊन स्कार्पने तिघींचा गळा आवळून खून करून, स्वत: आत्माहत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. मेलेल्या तिघीही असहाय आणि निष्पाप होत्या. तिघांचा त्याच्यावर विश्‍वास होता. तरीही त्याने तिघींना मारणे ही अतिशय क्रुर घटना आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सहायक जिल्हा सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.
सागर माधव गायकवाड (वय 40, रा. जांभुळकर मळा, फातिमानगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने आई शंकुतला (वय 58), पत्नी कविता (वय 34) आणि मुलगी इशिता (वय 7) या तिघींचा खून केला आहे. ही घटना 9 एप्रिल 2014 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत घडली. यामध्ये सहायक सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी 16 साक्षीदार तपासले. त्यामध्ये ज्याच्यासमोर घटनेची कबुली दिली. त्या मित्राची साक्ष महत्त्वाची ठरली. याबरोबरच सीसीटीव्ही फुटेज, घरातून जप्त केलेल्या सीपीओ मधील हार्डडिक्‍समध्ये त्याने 4, 5 आणि 6 एप्रिल रोजी आत्महत्या कशा करायच्या, याच्या पध्दती पाहिल्याचा एक्‍सपोर्ट रिपोर्टमध्ये सिध्द झालेला पुरावा महत्त्वाचा ठरला. सागर आणि कविता यांचा 2003 मध्ये प्रेमविवाह झाला होता. कविता एका नामांकित शाळेत शिक्षिका होत्या. तर, मुलगी दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. घटनेपूर्वी सागर बेरोजगार होता. त्याचे काम गेले होते. त्याने बॅंकेतून कर्जावर कार गाडी विकत घेतली होती. त्याचे हप्ते सुरू होते. तर एका खासगी सावकाराकडून 1 लाख 90 हजार रुपये घरखर्च आणि शेअर्स ट्रेडिंगसाठी विकत घेतले होते. तो सावकार पैसे परत मागत होता. घटनेच्या पूर्वी पंधरा दिवस सावकाराने त्याची कारगाडी नेली होती. तसेच गाडीचा हत्पाही वेळेवर जात नव्हता. त्यानंतर 8 एप्रिल रोजी त्या सावकाराने फोन करून त्याच्याकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दे, अन्यथा तुझ्या आई, पत्नी यांनाही मारहाण करेन, असे सावकराने त्याला म्हटले. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आपण मेल्यानंतर तिघींना त्रास होऊ नये, म्हणून घटनेच्या दोन दिवस पूर्वी आईला आजारपणासाठी लागणाऱ्या आणलेल्या झोपेच्या गोळ्या तिघींना खायला दिल्या. स्कार्पने गळा आवळून तिघींचा खून केला. त्यानंतर सिलिंग फॅन काढून तेथे ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मित्राला बोलावून घेतले. त्या मित्रासोबत गाडीवर जावून पोलिसात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, न्यायालयात त्याने साक्ष फिरविली. त्याने शपथेवर दिलेल्या साक्षीमध्ये तिऱ्हाईताने तिघींचा खून केला आहे. मी सावकाराच्या भीतीने लपून बसल्याचे सांगितले. मात्र, सरकारी पक्षाने त्यानेच तिघींचे खून केल्याचे सिध्द केले. तिघींच्या पोटात झोपेच्या गोळीचा अंश आढळून आला. यावरून त्यानेच तिघींना गोळ्या खाऊ घालून खून केल्याचे ऍड. कावेडिया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने त्याला भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) नुसार मरेपर्यंत जन्मठेप आणि 2 हजार रुपये दंड, तर, 309 (आत्महत्येचा प्रयत्न) नुसार सहा महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)