आंबेळे सरपंचाचे पद रद्द

सरपंच बेंद्रे पुढील पाच वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र

शिरूर- निवडणूक खर्चाचा हिशोब बाबत राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्‍टोबर 2016 नुसार निर्धारित केलेल्या विहित वेळेत सादर न केल्यामुळे आंबळे (ता. शिरूर) ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले आहे. तसेच या आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात येत आहे, असा निकाल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला, असल्याची माहिती तक्रारदार महेश नारायण बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सरपंच सोमनाथ बेंद्रे यांच्या विरोधात तपन अनिल बेंद्रे, महेश नारायण बेंद्रे, अनिरुद्ध संपत ढमढेरे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी अर्ज 13 नोव्हेंबर 2018 व दिनांक 4 डिसेंबर 18 तक्रारी अर्ज दाखल केले होते. आंबळे गावाची निवडणूक 26 सप्टेंबर 2018 मध्ये पार पडली. निवडणुकीत सरपंचपद संपूर्ण आंबळे गावातून निवडून द्यायचे होते, त्यासाठी सरपंचपदासाठी सोमनाथ बेंद्रे व महेश बेंद्रे या दोघात लढत होती. त्या निवडणुकीत सोमनाथ बेंद्रे सरपंचपदी निवडून आली होते.

अर्जदार यांच्या मते निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निवडणुकी खर्चाचा हिशोब देण्याचे शपथ पत्र बेंद्रे यांनी दिले होते; परंतु निवडणुकीचा खर्च 15 नोव्हेंबर 2018 रोजी तहसील कार्यालयात सादर केला आहे. तर सरपंचानी निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा 50 हजार असताना 72 हजार 630 रुपये खर्च केला आहे. त्यामुळे बेंद्रे यांनी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला असून तो मुदतीत सादर न केल्याचे तक्रार अर्जात नमूद केले होते. तसेच तक्रारदारांनी सोमनाथ बेंद्रे, शिरूरचे तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमनाथ बेंद्रे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार बेंद्रे यांनी त्यांचे म्हणणे मांडले होते. मात्र, त्यात राज्य निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ब) व जे निवडणूक आयोगाच्या दिनांक 15 ऑक्‍टोबर 2016 च्या आदेशाचे पालन केलेले दिसून येत नसल्याने त्यांचे पद रद्द ठरवत असल्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे तक्रारदारांनी सांगितले. तक्रारदारांच्या वतीने ऍड. शिवशंकर हिलाळ यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.