आंबेगाव तालुक्‍यात बाजरीच्या लागवडी खालील क्षेत्रात घट

पिकांना बसला फटका

अवसरी- आंबेगाव तालुक्‍यामध्ये बाजरी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे. चालू वर्षी आंबेगाव तालुक्‍यातील डिंभे धरणात असणारा अपुरा पाणीसाठा तसेच डाव्या व उजव्या कालव्याला सोडण्यात येणाऱ्या अवर्तनातील जास्त अंतरामुळे उन्हाळी बाजरीच्या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाल्याचे बोलले जात आहे.

आंबेगाव तालुक्‍यातील डिंभे, शिनोली, घोडेगाव, लांडेवाडी, मंचर, अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, जारकरवाडी, लोणी धामणी तसेच आंबेगाव तालुक्‍याच्या उत्तरेस असणारे चास, नारोडी, कळंब, चांडोली, खडकी पिंपळगाव यासह अनेक भागात बाजरी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते; परंतु चालू वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष लवकरच जाणवल्याने उन्हाळी बाजरीची लागवड तालुक्‍याच्या अनेक भागात कमी झाली आहे.

सुमारे साडे तीन-चार महिन्यात तयार होणारे बाजरीचे पीक आहे. प्रामुख्याने बाजरीचे पीक हे पावसाळ्यात घेतले जाते; परंतु पावसाळ्यात बाजरी काढणी मळणी करताना पाऊस पडल्यास धान्य आणि वैरण यांची गुणवत्ता कमी होते. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असल्यास पावसाळी बाजरी पेक्षा उन्हाळी बाजरीच्या पिकाचे उत्पादन जास्त मिळते म्हणून आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकाकडे कल मोठ्या प्रमाणावर असतो. सद्य परिस्थितीमध्ये उन्हाळी बाजरीचे पीक फुलोऱ्यात आली आहे. बाजरी काढण्या योग्य होण्यासाठी पंधरा ते एकवीस दिवसांचा कालावधी लागणार आहे.

उन्हाळी बाजरीपासून मिळणारे बाजरीचे धान्य आणि वाळलेली वैरण त्यांची गुणवत्ता चांगली असल्याने लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असते; परंतु भूगर्भातील पाणीसाठा खालावल्याने यावेळी बाजरीची लागवड कमी झाली आहे. फुलोऱ्यात आलेल्या बाजरी पिकाचे पक्षांपासून संरक्षण होण्यासाठी चांदीच्या रंगीबिरंगी पट्ट्या लावून फुलोऱ्यात आलेल्या कणासाचे रक्षण करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर शेतकरी बाजरी पिकाची राखणी करताना दिसत आहेत. गोफण, आसूड, तसेच रिकामे डबे वाजवून पक्षांना हिसकावून लावण्याचे काम करताना शेतकरी दिसत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.