आंबेगाव तालुक्‍यात दरोडा घालणाऱ्या तिघांना अटक

पुणे ग्रामीण पोलिसांना यश

मंचर- मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळती, रांजणी, पारगाव शिंगवे, मांदळवाडी तसेच पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निघोज, टाकळी ढोकेश्‍वर, म्हसे, वडनेर, भाबुळवाडा येथे घरफोडी करणाऱ्या तीन दरोडेखोरांना अहमदपूर (जि. लातूर) येथून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

शिरुर पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या टाकळी हाजी परिसरातील टेमकरवस्ती येथे मंगळवारी (दि. 2) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सुधाकर मनोहर काळे यांच्या घराच्या दरवाजावर दगड मारुन व कटावनीने दरवाजा उघडून तसेच खिडकीच्या गजावाटे आत प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण 67 हजार 500 रुपयांचा माल चोरुन नेला होता. तसेच सुधाकर काळे यांना व त्यांच्या कुंटुंबीयांना मारहाण केली होती. या प्रकरणी सुधाकर काळे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तपास करण्याबाबत आदेश दिला होता. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक घनवट यांनी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक रामेश्‍वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोपट गायकवाड, विशाल साळुंके, विजय कांचन, धिरज जाधव, बाळासाहेब खडके यांचे पथक तपास करण्यासाठी नियुक्त केले होते.

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पथक हे शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत टाकळी हाजी येथे घडलेल्या गुन्ह्याचे आरोपी अहमदपूर येथे येणार असल्याचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अहमदपूर येथून तीन जणांना अटक केली. आरोपींच्या विरोधात यापूर्वी चोरी, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी आदी गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे आरोपींची नावे उघड केली नाहीत, असे पोलीस निरीक्षक घनवट यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.