आंबेगाव तालुक्‍यातील भुजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट

रब्बी हंगामात केवळ 40 टक्‍के पेरणी

रमेश जाधव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रांजणी- आंबेगाव तालुक्‍यातील बहुतांशी गावांतील भुजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत यंदा तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याअभावी तालुक्‍यात रब्बी हंगामातील केवळ 40 टक्‍के पेरणी झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दरवर्षी अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला यंदाही दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. पाऊस वेळेवर न पडल्याने हातची पिके गेल्याने तालुक्‍यातील शेतमजूर आणि अन्य घटकही अडचणीत आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान गेल्या पाच वर्षांच्या ऑक्‍टोबरमधील सरासरीच्या तुलनेत 103 गावांपैकी जवळजवळ निम्या गावांमध्ये भुजल पातळी घटली आहे. तालुक्‍यात रब्बी हंगामातील पेरणी केवळ 57 टक्‍के झाली आहे. यावरुन दुष्काळाची तिव्रता स्पष्ट होते.
तालुक्‍यात यंदा 1 जून ते 31 ऑक्‍टोबर 2018 या काळात पावसाची वार्षिक सरासरी 991 मि.मी. ऐवजी 601 मि.मी. आहे. आगामी पुढील 4-5 महिन्याच्या कालखंडात पाण्याचा मोठा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे पाणी असलेल्या विहीरींचे अधिग्रहण करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. बळीराजाला दिलासा देण्याकरीता सरकारने 31 ऑक्‍टोबर 2018 रोजी तालुक्‍याला दुष्काळी तालुका म्हणून घोषित केले; परंतु असे असले तरी नुसता दुष्काळ घोषित करुन उपयोगाचे नाही तर त्यासाठी उपाय योजनांचीही गरज आहे.
दरम्यान, दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही शासनस्तरावर उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये शासनाविषयी नाराजीचा सूर आळविला जात आहे. तालुक्‍यातील भूजल पातळी घटल्याने लोकांच्या पाण्याचा प्रश्‍नही अधिक गहण होत चालला आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सध्या एका टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून हा पाणीपुरवठा तोडका पडत असल्याचे चित्र सध्या तरी आहे. आगामी काळात पाण्याच्या टॅंकरची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे.
कोट
शासकीय योजना सर्वसामान्य नागरीकांपर्यंत अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. जनावरांना लागणारा शासकीय चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्ग भरडाला जात आहे. शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्यांचा विचार शासनस्तरावर होत नाही. तालुक्‍यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने चारा छावणी सुरु करण्याची गरज आहे. आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात प्रामुख्याने चारा टंचाई आणि पिण्याच्या पाण्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरु करावी.
विजय आढारी, आंबेगाव तालुका शिवसेना आदिवासी संपर्क प्रमुख

  • एकुणच सध्याची तालुक्‍यातील पाण्याची परिस्थिती पाहता जवळजवळ निम्या गावांमध्ये भुजल पातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्यांच्या मजुरीमध्ये शासनस्तरावर वाढ करावी, पाण्याचा प्रश्‍न असणाऱ्या गावात दिर्घकालीन उपाययोजना राबविल्या गेल्या पाहिजेत. मात्र, तसे प्रयत्न होत नाहीत. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील समस्या तिव्र झाल्या असताना उपाययोजना राबविल्या जात नाहीत.
    सरपंच अंकुश थोरात, जाधववाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)