आंबेगाव तालुक्‍यातील ग्रामस्थांचा पाण्यासाठी संघर्ष

दुष्काळग्रस्त मांदळेवाडीत टॅंकरने पाणीपुरवठा

धामणी- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पाच ते सहा गावांना दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावात पाण्याचा टॅंकरने प्रवेश केला कि आला पाण्याचा टॅंकर पळा… पळा अशी जोरदार अरोळी देऊन पाण्याचा टॅकर आल्याचे नागरीक एकमेकांना सांगतात. अशी परिस्थिती सध्या मांदळेवाडी (ता. आंबेगाव) या ठिकाणी पाहायला मिळते. येथे दुष्काळाची तीव्रता एवढा आहे की, जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील बंधारे, नाले, विहिरी कोरड्या ठाक पडले आहेत. या परिसरात ग्रामस्थांबरोबर पाळीव जनावरांचे मोठे हाल होत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी टंचाई लक्षात घेऊन तीन पाण्याचे टॅकर सुरु केले आहेत.

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव मांदळेवाडी हे दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. येथील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. दरवर्षी साधारण मार्च, एप्रिल, मे या महिन्यात पाणी टंचाई निर्माण होते. पण चालू वर्षी पावसाने जूनपासूनच दडी मारल्याने या वर्षी जानेवारी महिन्यातच येथे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गेली तीन महिने पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे व अजून दोन महिने असाच संघर्ष करावा लागणार आहे. जूनमध्ये पाऊस पडेल यांची खात्री नाही.
येथील गावठाण व इतर वस्त्यांवर तीन पाण्याच्या टॅकरद्वारे नागरिकांना व जनावरांना वेळेवर पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सरपंच कोंडीभाऊ आदक यांनी केले आहे. जर तीन पाण्याच्या टॅकरच्या फेऱ्या कमी पडत असतील तर फेऱ्या वाढविल्या जातील असेही सरपंच आदक यांनी सांगितले.

  • सरकारचे दुर्लक्ष
    पाण्याची एवढी दरवर्षी भयानकता असताना शासन पातळीवर या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न गेली कित्येक वर्षी का सुटू शकला नाही? या भागासाठी वरदान ठरणारी म्हाळसाकांत जलसिंचन उपसा योजना गेली अनेक वर्षांपासून रखडली आहे. येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी का लक्ष घालत नाही? हे मात्र न समजण्यापलीकडचे आहे. एवढे मात्र खरे कि दरवर्षी तीन चार महिने येथील नागरिकांना टॅकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.