आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात अवैध वाळूउपसा

दहशत असल्याने तक्रारही कोणी करेना

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात महसूल विभागाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून रात्रीच्या वेळी वाळू आणि मुरमाची चोरी करून वाहतूक सुरू आहे. चार ब्रास वाळूचा ट्रक 25 हजार रुपये दराने विकला जात आहे, तर मुरुमाचा टक सुमारे 6 हजार रुपये इतक्‍या चढ्या भावाने विकला जात आहे. वाळू वाहतूकदार परिसरात दहशत निर्माण करत असल्याने त्यांची तक्रार करण्यास कोणी धजत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात निरगुडसर, पारगाव, अवसरी, मंचर परिसरात कॉम्प्लेक्‍स आणि बंगल्यांची मोठ्या संख्येने नवीन बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी वाळू आणि मुरुमाची गरज तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. तालुक्‍यात घोडनदी असल्याने पारगाव, लाखणगाव, देवगाव, शिंगवे आदी गावांलगत असलेल्या नदीपात्रातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. त्याकामी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन वाळू वाहतूक चालू असते. तसेच अवसरी बुद्रुक परिसरात महसूल विभागाच्या ताब्यातील डोंगर पोखरून रात्रीच्या वेळी मुरूम चोरी होत असते. मुरुमाचा एक ट्रक 6 हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या अवसरी, पारगाव, टाव्हरेवाडी, लोणी या चार गावांची पंचवार्षिक निवडणूक होती. या गावातील मंडल अधिकारी आणि तलाठी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, याचा फायदा वाळू व मुरूम ठेकेदार घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

अनधिकृत वाळू किंवा मुरूमाचे उत्खनन होत असल्यास तातडीने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच ग्रामस्थांनी आपल्या गावातील आणि परिसरातील वाळू आणि मुरूम चोरी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. जर कोणी वाळू आणि मुरूम चोरी करत असेल, तर संबधिताची गय केली जाणार नाही.
-रवींद्र सबनीस, तहसीलदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)