आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जलसंपदा खात्याचा दिलासा

माळशिरसकरांना उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन मिळणार

अकलूज- हक्काच्या पाण्यासाठी माळशिरसकरांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जलसंपदा खात्याने माळशिरसच्या वाट्याचे शिल्लक पाणी तत्काळ देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे माळशिरसला उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भाजप नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी यासंदर्भातील आश्वासन दिले असल्याचे जयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 29 एप्रिलला माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची बैठक अकलूज येथे झाली होती. माळशिरस तालुक्‍याला उन्हाळी हंगामासाठी 4.95 टीएमसी कोटा मंजूर झाला होता. त्यापैकी 3.03 टीएमसी पाणी माळशिरस तालुक्‍याने वापरले आहे. उर्वरित 1.92 टीएमसी पाणी माळशिरस तालुक्‍याला मिळणे बाकी आहे. या 1.92 टीएमसी पाण्यातून माळशिरस तालुक्‍याला उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन पूर्ण क्षमतेने दिले गेले पाहिजे, अशी मागणी जयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्वरूपाराणी मोहिते-पाटील आणि सर्व शेतकऱ्यांनी लावून धरली होती.

हक्काच्या पाण्यासाठी माळशिरस तालुक्‍यातील शेतकरी फलटण विभागाचे कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तातडीने मुंबईला जाऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली व येथील समस्या सांगितल्या. माळशिरसच्या पाणी प्रश्नासंदर्भात आपण स्वतः लक्ष घालू. तालुक्‍यावर अन्याय होणार नाही असे आश्‍वासन महाजन यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिला आहे. त्यामुळे 1.92 टीएमसी पाण्यातून माळशिरस तालुक्‍याला उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन मिळणार आहे.

  • नीरा उजवा कालव्याच्या संदर्भात माळशिरस तालुक्‍यातील जे काही प्रश्न आहेत त्यासंदर्भात जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेऊन ते प्रश्न जलसंपदा मंत्र्यांकडून सोडवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.
    – रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजप नेते

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.