आंदोलक इमारतीवर चढल्याने तारांबळ

मेढा, दि. 26 (प्रतिनिधी) –मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज जावली तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात. मेढ्यात मराठा समाज बांधवांनी झेंड्या बरोबरच दांडा मोर्चा काढून आता मूक मोर्चे नाही तर दांडू मोर्चे काढू, असा इशारा दिला. याचवेळी पाच कार्यकर्त्यांनी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर चढून ठोस आश्वासन द्या, नाहीतर उड्या टाकतो, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.
मराठा आरक्षणासाठी गुरुवारी जावली बंदची हाक देण्यात आली होती. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मेढा, केळघर, कुडाळ आदी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मेढ्यात मोर्चासाठी तालुक्यातून मराठा समाज बांधव जमायला लागले. साडेअकाराला मोर्चाला पंचायत समितीसमोरून सुरवात झाली. हजारो मोर्चेकरी जोरदार घोषणाबाजी करत होते.
हातात झेंडा होता पण त्याला तीन फुटाचा मजबूत दांडा होता. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल नाही तर आता झेंडा नाही तर दांडा असा संदेश जावलीकरांनी शासनाला दिला.
बाजार चौकात मोर्चा आल्यावर मोर्चेकर्‍यानी चौकात ठिय्या आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छोट्या मराठा भगिनींनी भाषणातून आरक्षणाची मागणी करून परिसर दणाणून सोडला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.
ठिय्या आंदोलनानंतर मोर्चाने तहसीदार कार्यालयाकडे कूच केली. तहसील कार्याल्यासमोरही मराठा समाज बांधवांनी ठाण मांडले. युवकांनी आरक्षणाची जोरदार मागणी करत जावळीतला मावळा आहे, अंत बघू नका. लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर उग्र आंदोलनाला सुरुवात होईल, असा इशारा दिला. निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदारांनी बाहेर यावे, अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी प्रवेशदवार येवून निवेदन स्वीकारले. यानंतर मराठा समाज बांधव पुन्हा बाजार चौकात आले व रास्ता रोको करू लागले. तासभर त्यांनी रास्तारोको केला.
दरम्यान, मेढ्यात मोर्चा सुरू असतानाच पाच आंदोलक एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर गेले. त्यांनी मुख्यमंत्री किंवा जिल्हाधिकारी चर्चेला आल्याशिवाय खाली उरणार नाही, खाली उडी टाकून बलिदान देऊ, असा पवित्रा घेतला. युवकांच्या इशार्‍यानंतर पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना समजावताना प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीदार रोहिणी आखाडे, सपोनि जीवन माने यांनी दमछाक झाली. मात्र, लवकर निर्णय घ्या, मुख्यमंत्र्यांना फोन लावा नाहीतर आम्ही उड्या टाकतो, असा इशारा तरुण देत होते. अखेर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल फोनवर बोलल्या व चर्चा करून 9 ऑगस्टपर्यंत शासन निर्णय घेणार आहे, आपण खाली उतरावे, अशी विनंती करून अरूण जवळ, गणेश जवळ, सचिन करंजेकर, प्रविण पवार, अनिल जवळ या युवकांना प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी खाली उतरवलं आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला. प्रारंभी आंदोलनात काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनावणे यांनी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)