अहिल्यादेवींच्या आदर्श राज्य कारभाराचे बीज माता-पित्यांच्या संस्कारात

प्रा.सागर मदने ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव
नगर – होळकरशाहीचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. यामध्ये महाराजा मल्हारराव, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी, महाराजा खंडेराव, राजपुत्रे मालेराव यांचे जीवनपट व शौर्यगाथा या विषयीचे वेगळे कंगोरे उलगडले. देवींच्या यशस्वी, धुंरधर लोककल्याणकारी राज्यकारभाराची बीजे त्यांच्या माता सुशिलादेवी व पिता माणकोजी शिंदे पाटील यांच्या संस्कारातून पेरली गेली. बालपणातच अहिल्यादेवींच्या शिक्षण व युद्ध कला प्रशिक्षणाची सुरुवात माणकोजी पाटलांनी केली. यामुळे बाल अहिल्या निर्भिड बनल्या व नदीकाठी महादेवाच्या पिंडीच्या रक्षणासाठी पेशव्यांच्या सैन्यासमोर उभ्या ठाकल्या, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.सागर मदने यांनी केले.
उत्कर्ष फौंडेशन आयोजित पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाचे उदघाटन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.सागर मदने, शाहीर भुषण राहिंज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.अशोक भोजने, प्रा.बाळासाहेब शेंडगे, नगरसेविका शारदा ढवण, दिपाली बारस्कर, विणा बोज्जा, कुमार वाकळे, लोकनेते दिगंबर ढवण, संपत बारस्कर, निखिल वारे, इंजि.डी.आर.शेंडगे उपस्थित होते. भव्य अशा मंचावर अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन व फटाक्‍यांच्या अतिषबाजीमध्ये दिमाखदार सोहळ्याची सुरुवात झाली.
सर्व पाहुण्यांचे स्वागत इंजि.डि.आर.शेंडगे यांनी केले. डॉ.अशोक भोजणे यांनी प्रास्तविकामध्ये फौंडेशनचे उपक्रम व वाटचाल या विषयी माहिती दिली.
पुढे बोलतांना प्रा.सागर मदने म्हणाले, अहिल्यादेवींनी काठेवाडापासून कलकत्त्यापर्यंत परकीय शक्तींनी जमीनदोस्त केलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार केला. महामार्ग, घाट, धर्मशाळा या सर्व लोकउपयोगी सुविधांची निर्मिती आपल्या खाजगीतील संपत्तीमधून केली.प्रा.मदने म्हणाले की, जर मल्हारराव होळकरांचा गनिमी काव्याने लढण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांनी ऐकला असता तर पानीपतचा निकाल वेगळा असता. महाराजा मल्हाररावांनी योग्य नितीचा अवलंब करत पेशव्यांनी देवदर्शनाला नेलेल्या बायका व मुले यांना गनिमांच्या तावडीतून सुखरुप सोडवण्याची चोख कामगिरी बजावली.महाराजा खंडेराव हे कुंभेरीच्या रणसंग्रामात प्रचंड पराक्रम करत वीरगती झाले. जर ते व्यसनी असते तर लढायला कदापी गेले नसते, असे सांगून इतिहासातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.
प्रसिद्ध शाहीर भुषण राहिंज यांनी आपल्या वीररसातून अहिल्यादेवींच्या जीवनातील जन्म सोहळा विवाह, युद्ध, पुत्रप्राप्ती, शोक, मृत्यू असे प्रसंगी साक्षात उभे केले. शाहिरीच्या या साजाला तमाम अहिल्याप्रेमींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. महोत्सवामध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा मानचिन्ह, अहिल्याचरित्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
हिंदवी शौर्य या ढोल पथकाच्या सुंदर अशा वादनाने कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला. महोत्सवाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले तर आभार प्रा.बाबासाहेब शेंडगे यांनी मानले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नानासाहेब देशमुख, ज्ञानेश्‍वर भिसे, प्रा.भगवान गवते, डॉ.सचिन पिसे, इंजि.प्रशांत आडभाई, डॉ.राहुल पंडित, डॉ.अविनाश गाडेकर, आर्कि. चंद्रकांत तागड, डॉ.परमेश्‍वर काळे, डॉ.गणेश पानसरे, डॉ.दिलीप दाणे, डॉ.महेंद्र शिंदे, प्रा.सुखदेव वडितके, राजेंद्र नजन यांनी नियोजन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)