अहंकारामुळे भाजपचा विनाश निश्‍चित

नवज्योत सिंग सिद्धू यांची मोदी-शहा यांच्यावर टीका


आगामी निवडणुकांत भाजप “नौ दो ग्यारह’ होईल


अण्णा हजारे यांचे आंदोलन देशाच्या भल्यासाठीच

पुणे – सध्याच्या सत्ताधारी पक्षामध्ये कमालीचा अहंकार भरला आहे. त्यामुळे तिथे विनाश निश्‍चित असून या सरकारच्या दबावामुळे स्वायत्त संस्थांची स्वायत्तता धोक्‍यात आली आहे. ही लढाई “बुलेट’ची नसून “बॅलेट’ची आहे, असे सांगत देशावरील राहू आणि केतुचे ग्रहण लवकरच जाणार आहे, अशी टीका पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केली.

भारती विद्यापीठामध्ये आयोजित विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. विश्‍वजित कदम, युवक कॉंग्रेसचे सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.

सिद्धू म्हणाले, “सत्ताधारी पक्षालाच प्रश्‍न विचारले जातात. पण, केंद्रातील भाजप सरकारकडून विविध भागात कोणत्याही व्यक्‍तीने समस्येबाबत आवाज उठवल्यास भाजप मंत्र्यांकडून संवाद साधला जात नाही. हे केवळ दंडतंत्राच्या माध्यमातून संवाद साधतात. अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. शेती मालास भाव नाही, तरुण वर्गाला नोकरी नसल्याने आलेल्या नैराश्‍यामुळे आत्महत्येच्या घटना घडत आहेत. त्यावर सरकार काही करताना दिसत नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.

अमित शहांच्या बॅंकेत पैसा आला कसा?
नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येईल. असे पंतप्रधान सांगत होते. मात्र तो पैसा बाहेर आला नसून तो पैसा स्विस बॅंक, जागा आणि सोन्यामध्ये अजून ही गुंतवला आहे. खरा काळा पैसा हा अजूनही विदेशात आहे. नोटाबंदीच्या काळात अमित शाह यांच्या एक बॅंकेत 5 दिवसांत 750 कोटी कसे आले, असा सवालही सिद्धू यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रियंकांमुळे सकारात्मक ऊर्जा
“प्रियांका गांधी यांच्यामुळे कॉंग्रेसमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. आतापर्यंत राहुल गांधी एकटेच लढत होते. त्यांना प्रियांका गांधी यांची साथ मिळाली आहे त्यामुळे “एक और एक ग्यारह आणि बीजेपी नौ दो ग्यारह’ होईल, अशा शब्दात त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. प्रियंका गांधी यांना सोपे काम देण्यात आलेले नाही. पूर्वउत्तर प्रदेश जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. सर्वसामान्य जनतेला प्रियंका गांधी यांच्यामध्ये इंदिरा गांधी यांची छबी दिसते. त्यांच्यामुळे कॉंग्रेसला निश्‍चितच फायदा होईल,’ असेही सिद्धू म्हणाले.

अण्णा हजारे यांचा सन्मान राखावा
“अण्णा हजारे हे एका विशिष्ट विचारधारेने प्रेरित आहेत. अण्णांनी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने देशाची सेवा केली आहे. त्यांना कशाचीही अपेक्षा नाही. देशाच्या भल्यासाठीच ते आंदोलन करीत आहे. अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अण्णा हजारे यांचा सन्मान राखला गेला पाहिजे,’ असेही मत सिद्धू यांनी व्यक्‍त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.