पुणे,दि.25 – महाराष्ट्र अस्थिरोगतज्ज्ञ संघटनेच्या स्थापनेला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संघटनेच्या सोळाशे सभासदांच्या माध्यमातून 6 तास मोफत सेवा देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. 1 मे 1983 साली संघटनेची स्थापना करण्यात आली होती अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष व संचेती हॉस्पिटलचे डॉ.पराग संचेती यांनी दिली.
याबाबत पत्रकार परिषद घेऊन संघटनेने याची माहिती दिली. संचेती म्हणाले, महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे राज्यभरात 1614 सभासद आहेत. महाराष्ट्र अस्थिरोग संघटना ही त्यांच्या सभासदांसाठी वैद्यकीय ज्ञान वृद्धीसाठी तसेच त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी काम करते. समाजाशी बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने संघटनेने या वर्षापासून आपली स्थापना दिवस 1 मे हा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे ठरविले आहे. यामध्ये संघटनेने सर्व सभासदांना आवाहन करून 1 मे रोजी किमान 6 तास मोफत सेवा देण्याचे तसेच आरोग्यविषयक अस्थिरोगातील समस्यांवर सामान्य जनतेला मार्गदर्शन करायचे ठरविले आहे. या आवाहनानुसार जवळपास सर्वच जिल्हास्तरीय संघटना 1 मे रोजी मोफत तपासणी शिबिर तसेच आरोग्य शिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण राज्यात करणार आहेत.
या मध्ये इतर ही सेवाभावी संस्थाही मदत करणार आहेत. या दिवशी तसेच या निमित्ताने सप्ताहभर 29 एप्रिल ते 4 मे विविध जनजागृतीपर कार्यक्रम वृक्षारोपण मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात येणार आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात हाडांचा ठिसूळपणा, प्रथमोपचार गुडघेदुखी, कंबरदुखी, अपंगत्व या विषयांवर जनजागृतीपर व्याख्याने करण्यात येणार आहे.
यासाठी भित्ती पत्रके, माहिती पत्रके, वर्तमानपत्रमधून जनजागृती, तसेच विविध समाजमाध्यमांचा वापर करुन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालये,विविध सेवाभावी संस्था, जेष्ठ नागरिक संघ, पोलीस दल आदींच्या माध्यमातून व्याख्याने, चर्चासत्र यद्यारे आरोग्य शिक्षण जनजागृतीचे काम या दिनानिमित्त करण्यात येणार आहे. या सर्व सेवा सुविधांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा