असे असेल शहराचे पोलीस आयुक्‍तालय

  • अधिसूचना जारी ः अपर पोलीस महासंचालक दर्जाचे आयुक्‍त

पिंपरी – गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आणि मागण्याच्या फेऱ्यात अडकलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला सरकार मान्यता मिळाली असून या संदर्भातील सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी बाब म्हणजे सरकारकडून अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराला मिळणारे आयुक्‍त हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे असणार असल्याचे या अधिसूचनेद्वारे स्पष्ट झाले आहे. तसेच ग्रामीण आणि शहरातील पोलीस ठाण्यांचे सहाय्यक आयुक्‍त कार्यालयातंर्गत विभाजन करण्यात आले आहे.

नवनिर्मित पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाकरता विविध संवर्गातील एकूण नव्याने 2633 पदे तीन टप्प्यांमध्ये भरती करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्‍के म्हणजे 1568 पदे, दुसऱ्या टप्प्यात 20 टक्‍के म्हणजे 552 आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरीत 20 टक्‍के म्हणजे 513 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण पंधरा पोलीस ठाणे असणार आहेत. त्यात सांगवी, हिंजवडी, वाकड, पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, चिखली ही शहरातील दहा पोलीस ठाणे असणार आहेत तर ग्रामीण कार्यक्षेत्रातील चाकण, आळंदी, देहुरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी ही पाच पोलीस ठाणी समाविष्ट करण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयुक्‍तालयाचे स्वरुप व रचना
शहराला अपर पोलीस महासंचालक दर्जाचे पोलीस आयुक्‍त मिळणार आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचे अपर पोलीस आयुक्‍त मिळणार आहेत. पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्‍त दर्जाचे दोन पोलीस उपायुक्‍त असणार आहेत. तसेच सात सहाय्यक पोलीस आयुक्‍त असणार आहेत. ही सर्व पदे पहिल्याच टप्प्यात निर्माण केले जाणार आहेत. 36 पोलीस निरीक्षक असणार असून त्यापैकी 24 पहिल्या टप्प्यात, 7 दुसऱ्या टप्प्यात आणि 5 तिसऱ्या टप्प्यात निर्माण केले जाणार आहेत. 58 सहाय्यक पोलीस निरीक्षक असणार असून पहिल्या टप्प्यात 36, दुसऱ्या टप्प्यात 14 आणि तिसऱ्या टप्प्यात 8 पदे निर्माण केली जाणार आहेत. याचप्रकारे शहराला 120 पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 151, पोलीस हवालदार 290, पोलीस नाईक 562 आणि पोलीस शिपाई 1255 पदे निर्माण केली जाणार आहेत.
या व्यतिरिक्‍त अकार्यकारी दलात ज्यात प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक व इतर अशी एकूण 21 पदांवर 119 नेमणुका केल्या जाणार आहेत. पोलीस दवाखान्याकरिता एकूण 31 पदे निर्माण केली जाणार आहेत.

पोलीस उपायुक्‍त गुन्हे / विशेष शाखा, मुख्यालय अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्‍त, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्‍त विशेष शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्‍त प्रशासन, सहाय्यक पोलीस आयुक्‍त वाहतूक ही पदे असणार आहेत. पोलीस उपायुक्‍त परिमंडळ-1 अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्‍त देहुरोड विभाग आणि सहाय्यक पोलीस आयुक्‍त पिंपरी विभाग असणार आहे. देहुरोड विभागातंर्गत देहुरोड पोलीस ठाणे, तळेगाव पोलीस ठाणे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, निगडी पोलीस ठाणे असणार आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्‍त पिंपरी विभागातंर्गत पिंपरी पोलीस ठाणे, चिंचवड पोलीस ठाणे, भोसरी पोलीस ठाणे, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे असणार आहेत. परिमंडळ दोन अंतर्गत सहायक पोलीस आयुक्‍त वाकड विभाग आणि सहाय्यक पोलीस आयुक्‍त चाकण विभाग असणार आहेत. वाकड विभागातंर्गत वाकड, हिंजवडी आणि सांगवी ही पोलीस ठाणे असणार आहेत. चाकण विभागांतर्गत दिघी, चाकण, आळंदी आणि चिखली ही पोलीस ठाणे असणार आहेत.
तसेच शासकीय इमारत, शासकीय निवासस्थाने, वाहने, शस्त्रे-दारुगोळा व इतर साधनसामग्री आयुक्‍तालयात समाविष्ट करण्यात आले आहेत. 2633 नवीन पदे निर्माण करण्यासाठी 179 कोटी 169 लाख 94 हजार रुपये, कार्यालयीन खर्च व निवासस्थाने बांधकामासाठी 212 कोटी 87 लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

उल्लेखनीय बाब अशी की, काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री गिरीश बापट यांनी आयुक्‍तालयाबाबत बैठक आयोजित केली होती. स्वातंत्र्यदिनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालय सुरु होण्याची शक्‍यता वर्तवली होती. शासनाकडून अधिसूचना प्रकाशित केल्याने 15 ऑगस्टपासून पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय सुरु होण्याच्या शक्‍यतेस बळ मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)