अष्टविनायक रस्ते जोडणीचे भूमिपूजन मुख्यंमत्र्यांच्या हस्ते

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ः शिवजयंतीच्या मुहुर्तावर काम सुरू

शिवनेरी- अष्टविनायक रस्ते जोडणी कामांचा भूमीपूजन समारंभ 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहुर्तावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
खासदार आढळराव पाटील म्हणाले की, युती सरकार सत्तेवर आल्यानंतर आपण केंद्राच्या भारतमाला रस्ते जोडणी प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायकाचे दर्शन एक दिवसात करता यावे, यासाठी अष्टविनायक मार्ग किमान दुपदरी व्हावा, अशी मुख्यमंत्र्यांसह बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. 8 मार्च 2015, 3 एप्रिल 2015, 16 ऑक्‍टोबर 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रव्यवहार करून आणि समक्ष भेट घेऊन अष्टविनायक जोडणी प्रकल्प मंजूर करावा, यासाठीही पाठपुरावा केला होता. याबाबत मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री यांनी पुणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांना याबाबतचा आवश्‍यक प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते. प्रस्ताव लवकरात लवकर सादर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनाही पत्र्यवहार व बैठकीद्वारे पाठपुरावा केला होता, तसेच हा रस्ता ज्या भागातून जातो, त्या भागातील लोकप्रतिनिधींनी देखील या कामासाठी पाठपुरावा केला आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिवनेरी गडावर येणार असून, याच मुहूर्तावर राज्य शासनाच्या हायड्रेड ऍन्युयिटीअंतर्गत मंजुरी मिळालेल्या 281.13 कि. मी. लांबीच्या 835.80 कोटी रकमेच्या प्रकल्पाचा भूमिपूजन समांरभ आयोजित केला आहे. या समारंभास महाराष्ट्र शासनाचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शिरूर-आंबेगाव-जुन्नर तालुक्‍यातील राजमार्ग 128 – रांजणगाव- मलठण – खडकवाडी- नारायणगाव- ओझर- ओतूर रस्ता 73 कि. मी., जुन्नर तालुक्‍यातील बनकरफाटा ते लेण्याद्री 11.50 कि. मी., लेण्याद्री ते ओझर 10 कि. मी., लेण्याद्री फाटा-पिंपळगाव सिध्दनाथ-गणेशखिड-सितेवाडी राजमार्ग 222 रस्ता 13 कि. मी., शिरूर तालुक्‍यातील तांदळी-इनामगाव रस्ता 6 कि. मी., राजमार्ग 118 न्हावरा-कर्पेवाडी रोड 10 कि. मी., कर्पेवाडी-रांजणगाव रस्ता 9 कि. मी. या रस्त्याचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे.
याशिवाय किल्ले शिवनेरी अंबरखाना संग्रहालय आणि जुन्नर नगरपरिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या जिजामाता उद्यानातील संग्रहालयाचे भूमिपूजन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)