अशोक काळे यांनीच घालविले कालव्याचे पाणी

शरद थोरात यांचा आरोप; आशुतोष काळेंच्या टीकेला प्रत्युत्तर
कोपरगाव – गेल्या दहा वर्षांत आपल्याच वडिलांच्या आमदारकीच्या काळात 2005 च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये गोदावरी कालव्यांचे पाणी घालविले. त्यांच्याच कारकीर्दीत भूजल कायदे झाले; मात्र त्याचे नियम त्यांना अस्तित्वात आणता आले नाहीत. ही वस्तुस्थिती असताना राजकीय विरोधक आपल्या अकलेचे तारे तोडून त्याचे खापर आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर फोडत आहेत. शेतकऱ्यांमध्ये ते गैरसमज पसरवीत आहेत. भूजल कायद्यासंदर्भात अभ्यास करून त्यावर हरकती घेण्यापेक्षा त्याला राजकीय स्वरूप देऊन पत्रकबाजी करण्यात ते धन्यता मानीत आहे, अशी टीका भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी आशुतोष काळे यांचे नाव न घेता केली.
महाराष्ट्र शासनाने भूजल संरक्षणार्थ यापूर्वी पारित केलेल्या कायद्याला नियमावली केली नव्हती. ती आता तयार केली आहे. आ. कोल्हे यांनी मंत्रालय, विधिमंडळ, अधिवेशन व पाणीपुरवठा तसेच जलसंपदा मंत्रिस्तरावर अभ्यास केला. आवश्‍यक त्या ठिकाणी बदल करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांचे हीत त्या पाहत आहेत, असे निदर्शनास आणून ते म्हणाले, की भूजल कायद्यासंदर्भात बनविलेल्या नियमावलीचा अभ्यास करून त्यावर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे हरकती घ्याच्या आहेत. असे असताना विरोधक त्यासंदर्भात अकारण राजकारण करीत आहेत. पाणी उपलब्ध करून ते केवळ भाजप-शिवसेनेच्याच शेतकऱ्यांना मिळावे, असे धोरण आ. कोल्हे यांनी कधीही घेतले नाही. उलट शेतकऱ्यांचे प्रश्न त्या तळमळीने सोडवित आहेत. तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वैतरणेचे समुद्राला वाया जाणारे पाणी वळविण्याबाबत शासन निर्णय करून त्याबाबत पावले उचलली आहेत.
आ. कोल्हे यांनी स्वत:च्या मतदारसंघात शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू असताना त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर नेला. एका महिला लोकप्रतिनिधीने हा प्रश्‍न सोडविण्यासाठी उचललेली पावले विरोधकांना अजूनही सहन झालेली नाहीत. त्याचेच तुणतुणे ते सारखे वाजवीत आहेत. उलट केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला. गेली साठ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत, तेव्हा विरोधकांनी उगाचच वडयाचे तेल वांग्यावर काढले. भूजल कायद्याच्या नियमासंदर्भात अकलेचे तारे तोडले. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असा सल्ला थोरात यांनी काळे यांना दिला आहे. दोन दिवसांपूर्वी काळे यांनी कोल्हे यांच्यावर पाणीप्रश्‍नाबाबत टीका केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)