अशुद्ध पाण्याचा “बाजार’ ठरतोय आरोग्याशी खेळ

बाटलीबंद पाणी व्यवसायात बोगस कंपन्यांचा सुळसळाट

– अतुल बोराटे

नांदूर- जिल्ह्यात बाटलीबंद पाणी विक्री व्यवसाय करणाऱ्या बोगस कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्या दररोज साधारणपणे 70 हजार लिटर पाणी खपवितात. अशुद्ध पाण्याचा हा ‘बाजार’ म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळच आहे.
जिल्ह्यात 60 ते 70 अशा बोगस कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडून एक लिटरपासून 20 लिटर पाणी विक्री व्यवसाय जोरात सुरू आहे. अशा बोगस कंपन्यांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत बाटलीबंद पाणी विक्री करणाऱ्या बोगस कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता केवळ बाटल्या खपविण्यावर भर दिला जातो.
महामार्गालगतची रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबे या ठिकाणी सर्रासपणे या बेकायदेशीर कंपन्यांच्या पाण्याची विक्री सुरू आहे.

 • स्वस्त दरात केली जाते विक्री
  बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नळाचेच पाणी वापरले जाते. बाजारात लायसन्सधारक कंपन्यांच्या 20 लिटर जारची किंमत 50 ते 60 रुपये आहे. मात्र, बोगस कंपन्यांकडून ती केवळ 25 ते 30 रुपयांत विकली जाते.
 • परवानगी आवश्‍यक…
  बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डची (बीआयएस) आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची मान्यता, परवाने असावे लागतात. या सर्व परवानग्या असलेला वितरकच बाटलीबंद पाण्याची विक्री करू शकतो; परंतु सगळे नियम धाब्यावर बसवून नागरिकांना अशुद्ध पाणी विकत त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि आर्थिक लूट बोगस कंपन्यांकडून सुरू आहे.
 • पाणी शुद्धतेच्या चाचण्या
  सॅंड फिल्टरेशन ः टाकीत पाणी सोडून वाळूच्या साहाय्याने गाळ बाजूला करणे
  कार्टरेज फिल्टरेशन ः पाण्यातील सूक्ष्म माती व इतर अनावश्‍यक कण बाजूला करणे
  रिव्हर्स ऑसमॉसिस ः विहीर, कूपनलिका किंवा काही ठिकाणी नदीच्या पाण्यातही मोठ्या प्रमाणात क्षार असतात. तसेच विविध नैसर्गिक धातूंचे पाण्यात मिश्रण झालेले असते. ते क्षार आणि धातू पाण्यातून काढून टाकले जातात.
  ओझोनायझेशन ः पाण्यावर ओझोनायझेशन किरणांचा मारा करून त्यातील जीवाणू आणि विषाणू मारले जातात.
 • पाणी शुद्धीकरणाच्या सर्व प्रक्रिया केल्यानंतर पाणी खरोखर शुद्ध झाले का, याची खात्री करण्यासाठी मिनरल वॉटर प्लॅंटमध्ये प्रयोगशाळा असावी लागते. तेथे केमिस्ट व मायक्रो बॉयालॉजिस्ट असावे लागतात. त्यांनी प्रयोगशाळेत पाणी शुद्ध झाल्याची खात्री केल्यानंतरच ते विक्रीसाठी बाटलीबंद करून त्याची विक्री केली जाते; पण या चाचण्या न करताच काही ठिकाणी पाणी विक्री केली जात आहे.
  – योगेश बोराटे, विविध कार्यकारी सोसायटी माजी अध्यक्ष, नांदूर
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×