अव्वल थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त

राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचा एकमेव पुरुष सुवर्णपदक विजेता
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल 15 वर्षे देशाचे आव्हान सांभाळणारा भारताचा अव्वल थाळीफेकपटू विकास गौडा याने आज सर्व प्रकारच्या स्पर्धांमधून निवृत्ती जाहीर केली. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा गौडा हा भारताचा एकमेव पुरुष थाळीफेकपटू आहे. गेल्या वर्षी आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्यानंतर गौडाने एकाही प्रमुख स्पर्धेत भाग घेतला नसल्यामुळे त्याची निवृत्ती अनपेक्षित नव्हती. गौडाने भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाला पत्र पाठवून निवृत्तीची इच्छा प्रकट केल्यानंतर महासंघाने त्याच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. मी माझ्या शरीराला आणखी शिक्षा देऊ इच्छित नाही आणि जीवनातील पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी ऍथलेटिक्‍समधून बाहेर पडणे आवश्‍यक आहे, असे सांगून गौडा म्हणाला की, भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या जीवनातील सर्वोच्च सन्मान होता.

गौडा सहा वर्षांचा असतानाच त्याचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्याचे वडील शिवे गौडा हे माजी ऍथलीट असून ते 1988 ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक होते. गौडाच्या नावावर 66.28 मी. या राष्ट्रीय विक्रमाची नोंद असून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पदके पटकावणाऱ्या भारतीय ऍथलीट्‌सपैकी तो एक आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी न झाल्यामुळे आगामी आशियाई स्पर्धेतून त्याचे नाव मागे पडले होते. गौडाने 2013 व 2015 आशियाई मैदानी स्पर्धेत सुवर्ण, 2014 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण व 2010 स्पर्धेत रौप्य, तसेच 2014 आशियाई स्पर्धेत रौप्य व 2010 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने 2004, 2008, 2012 व 2016 अशा चार ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्याला केवळ एकदाच, लंडन-2012 ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठता आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी गौडाच्या कामगिरीबद्दल गौरवोद्‌गार काढले. गौडाच्या कामगिरीमुळे भारतातील उदयोन्मुख व युवा ऍथलीट्‌सना प्रेरणा मिळाली, असे सांगून ते म्हणाले की, गौडाने मिळविलेल्या यशातून त्याचे परिश्रम, निष्ठा आणि सातत्य दिसून येते. त्याच्या भविष्यातील योजनांसाठी मी त्याला शुभेच्छा देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)