अवघा रंग एक…

– डॉ. विनोद गोरवाडकर

वारकऱ्याने पंढरपूरला जाणे हा वारकऱ्याचा प्रमुख आचारधर्म असला तरी, त्याच्यासोबत वारकरी पंथाच्या संपूर्ण तात्त्विक भागाचा स्वीकार, नामस्मरणाची साधना आणि सदाचाराचा मनपूर्वक अवलंब केल्याने शरीराची वारी पंढरपूरला गेल्याने होत असतानाच मनाचीही अंतयात्रा आपोआप होऊ लागते. “तन आणि मन’ दोहोंच्या पातळीवरची ही विलक्षण वारी अध्यात्माच्या प्रवासातली कमालीची घुसळण प्रत्येक वारकऱ्यासाठी त्याच्या पुढ्यात ठेवते. “साधनेचे सार’ अशा शब्दात एकनाथांनी वारीचे महत्त्व विषद केले आहे.

“मरण मुक्ती वाराणशी। पितृऋण गया काशी। उधार नाही पंढरीशी। पायापाशी विठोबाच्या।।” म्हणणारे तुकोबा पंढरपूरला वारकरी होऊन गेल्यास सारे फळ रोकडा मिळते, उधारीची गोष्टच नाही असे रोखठोक शब्दात सांगतात.

“हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी” ही ज्ञानदेवांच्या हरिपाठातील ओळ संपूर्ण वारकरी संप्रदायाचा सारच जणू आपल्यापुढे उघडून ठेवते, म्हणूनच वारीतही हरिपाठ नित्यनेमाने सामूहिकरित्या म्हटला जातो. “देहासाठी आचार आणि मनासाठी विचार’ हे सूत्र अतिशय चिंतनातून प्रत्येक वारकऱ्यासाठी निश्‍चित केले गेले आहे. माझा प्रत्येक वारकरी हा सदाचारीच असावा, त्याने समोरच्या वारकऱ्याला “माऊलींच्या रुपात बघावे, त्याने सात्विक आहार घ्यावा, ज्ञानेश्‍वर, एकनाथी भागवत आणि तुकोबांची गाथा ही प्रस्थानत्रयी त्याने म्हणावी, वाचावी, आत्मसात करावी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, चिरंजीवपद, श्रीविष्णूसहस्त्रनाम स्त्रोत्र आणि श्रीमद्‌भगवतगीता हे सहा ग्रंथ वारकऱ्यासाठी पूज्य ठरावेत हा सर्व भाग विचारपूर्वक संप्रदायाला पुढे नेणाऱ्या साऱ्यांनी निश्‍चित केला. शरीर आणि मन याचा अविभाज्य असणारा संबंध सखोलपणे लक्षात घेऊन मनाच्या पातळीवर वारकरी भरकटू नये आणि मन भरकटले नाही तर शरीरही वावगे वागणार नाही यासाठीच वारकरी आचारधर्म निर्माण झाला.

वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग अर्थात श्रीविठ्ठल होय. श्रीविठ्ठल हे विष्णूचे रूप मानले गेल्याने विठ्ठलाची उपासना करणाऱ्यांना वैष्णव किंवा विष्णूदास असे म्हटले जाते. म्हणूनच तुकोबांनी एका अभंगात “विष्णूमय जग। वैष्णवांचा धर्म’ असे म्हटले आहे. वारीतला हा प्रत्येक वैष्णव, त्याच्या आराध्य दैवताशी कमालीचा एकनिष्ठ असतो. त्याची ती भक्‍तीची नशा त्याला पंढरपूरला केव्हा घेऊन येते, त्याचे त्यालाही समजत नाही. पहाटे उठलेला वारीतला प्रत्येक वेडा विठूभक्‍त रात्री उशिरा हरिनामाच्या गजरात निद्राधिन होतो. त्याच्या जगी पंढरीच्या पांडुरंगाशिवाय दुसरे काही महत्त्वाचे नसते. त्याच्या शरीराची आणि मनाची यात्रा केवळ “”प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले। सार्थक पै झाले संसारीचे।।” यासाठीच होत रहाते.

“यात्रे अलंकापुरी येती। ते ते आवडती विठ्ठला।। पांडुरंगे प्रसन्नपणे। केले देणे हे ज्ञाना।। भू वैकुंठ पंढरपूर। त्याहूनि थोर महिमा या।। निळा म्हणे जाणोनी संत। येती धावत प्रतिवर्षी।” या शब्दात संतश्रेष्ठ निळोबा वारीला येणाऱ्या वारकऱ्यांविषयी लिहितात, पांडुरंगाला प्रिय असणाऱ्या वारकऱ्यासाठी याहून अधिक चपखल भावना दुसऱ्या कोणत्या असू शकतील? म्हणूनच पंढरीच्या वारीचा महिमा इतर तीर्थयात्रांपेक्षा अगाध आहे, हे साऱ्याच संतांनी वेगवेगळ्या शब्दात सांगितलेले दिसते. माणूस काशीयात्रेला वा इतर तीर्थक्षेत्रांना एकदा जातो आणि पंढरीला मात्र त्याला वारंवार जावेसे वाटते. कारण पापक्षालन आणि पुण्यसंपादन करणे हा हेतूच वारी करण्यापाठीमागे कोणी ठेवत नाही.

वारीसाठी असणारी विठ्ठलाची परमभक्‍ती आणि पंढरपुरी गेल्यानंतर प्राप्त होणारे अनुपम सुख याची वारंवार अनुभूती व्हावी हीच भावना वारकऱ्याच्या मनीमानसी घट्टपणे रुजलेली असते. एकदा या वारीचा अनुभव घेतला की पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटते, पुन्हा पुन्हा या भक्‍तीरसात रंगावेसे वाटते आणि पुन्हा पुन्हा “पिक पिकले घुमरी। प्रेम न समाये अंबरी। अवघी मातली पंढरी। घरोघरी सुकाळ।।” असे म्हणावेसे वाटते. जन्ममरणाची येरझार भक्‍तीच्या मार्गाने जाऊनच संपवायची असते आणि त्यासाठी पंढरीची येरझार वारकरी करीत असतो.

“चला पंढरीसी जाऊ। रखुमादेवीवरा पाहू। डोळे निवतील कान। मना तेथे समाधान। संत महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी।। ते तीर्थांचे माहेर। सर्व सुखाचे भांडार।। जन्म नाही रे आणिख। तुका म्हणे माझी भाक।।” अशा सुरेख शब्दात पंढरीच्या वारीचा महिना तुकोबांनी साऱ्यांसाठी वर्णिला आहे.

निवृत्तीनाथांची, तुकोबांची, ज्ञानोबांची अशा पालख्या ठरलेल्या दिवशी निघतात. त्यांना बाकीच्या अनेक ठिकाणच्या दिंड्या येऊन मिळतात. पुण्यात त्या एकत्रित होतात. पुणे नगरी पुण्यमय होते. तुकोबा-ज्ञानोबांचे दर्शन सारे वैष्णव अंतरीच्या असोशीने, निर्लेप वृत्तीने आणि निरपेक्ष प्रीतीने घेतात. अवघा रंग एक होतो. हा रंग फक्‍त आणि फक्‍त भक्‍तीच्या रंगानेच माखलेला असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.