अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला 7 वर्षे सक्‍तमजूरी

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 7 वर्षे सक्तमजूरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी हा आदेश दिला आहे.
बलात्कारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीने तिच्याबरोबर लग्न केले. मात्र, घटनेच्या वेळी ती अल्पवयीन असल्याचा मुद्दा गंभीर होता, असे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी बंटी सूर्यकांत पाटील (वय 24 रा. लक्ष्मी निवास, कळस माळवाडी, विश्रांतवाडी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
पीडित मुलगी 16 वर्षापेक्षा कमी वयाची होती. आरोपीला ती अल्पवयीन आहे, हे माहित असूनही त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले होते. त्यातून गरोदर राहिली होती. मात्र, तिने घरी सांगितले नव्हते. 27 जानेवारी 2017 रोजी ती घरातील स्वच्छतागृहात गेली. मात्र ती बराच वेळ बाहेर आली नाही. म्हणून तिच्या आईने तिला आवाज दिला. तिने दरवाजा उघडला असता तिला मुलीचा गर्भपात झाल्याचे दिसले. त्यांनी तिला आणि गर्भाला तातडीने ससून हॉस्पिटल येथे दाखल केले. तिथे डॉक्‍टरांनी गर्भाला मृत घोषित केले. ससूनमध्ये डॉक्‍टरांनी पीडितेचा, गर्भाचे, आरोपीचे रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठी काढून घेतले होते. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंगल जोगन यांनी केला होता. या प्रकरणात आरोपीने गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलीशी विवाह केला असून, ते एकत्र राहण्यास तयार आहेत, असे न्यायालयाला सांगण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. पीडित मुलगी, तिची आई, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडित मुलीच्या वयाचा पुरावा, डीएनए तपासणी अहवालद्वारे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयच्या निदर्शनास आणून दिले की, घटनेच्या वेळी पीडित अल्पवयीन होती. आरोपीने जरी घटनेनंतर तिच्याबरोबर विवाह केला असला तरी त्यामुळे घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायलयने आरोपीला शिक्षा सुनावली. कोर्ट कामकाजात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार के. बी. जगताप यांनी सहाय्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)