अर्धांगिनी बनली वारीची ‘सारथी’…

पुणे :”लग्नानंतर एका अपघातात डोळे गमावणाऱ्या नवऱ्याला संसारात साथ देणाऱ्या शारदाबाई, पंढरीच्या वारीतही नवऱ्याची साथ निभावत आहेत. गेली 20 वर्षे हे घराडे दाम्पत्य माऊलींच्या वारीत सहभागी होत आहेत. दोन्ही डोळ्याने अंध असणाऱ्या मारूती घराडे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी या केवळ संसाराच्याच नव्हे, तर वारीतील प्रवासाच्याही सारथी बनल्या आहेत. मूळचे परभणी येथील घराडे दाम्पत्य हे गेल्या 20 वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आहेत.

शारदाबाई यांचे वय अंदाजे 52 वर्षे तर मारूती यांचे वय अंदाजे 59 वर्षे इतके आहे. विठुरायाच्या भक्‍तीपोटी हे दाम्पत्य दरवर्षी पुण्यात येऊन वारीमध्ये सहभागी होतात. “माझ्या पत्नीमुळेच खऱ्या अर्थाने वारी आणि आयुष्य दोन्ही सार्थकी लागते. ती सोबत असल्यानंतर वाट दाखविण्यासोबतच प्रत्येक गोष्टीची काळजीदेखील घेत आहे. तिच्यामुळेच पांडुरंगाचे दर्शन घडू शकते. त्यामुळेच दरवर्षीची वारी हा एक संपन्न करणारा सोहळा असतो. यानिमित्ताने पुण्यातील आप्तेइष्टांची भेटही होते,’ असे मारूती घराडे यांनी सांगितले.

वारीबद्दलची ओढ अजूनही कायम

वारीतील अनुभवाबद्दल घराडे दाम्पत्य म्हणाले, “गेली अनेक वर्षे आम्ही या वारीत सहभागी होत आहे. पाडुरंगाचे नामस्मरण करत प्रवास कधी पूर्ण होतो हे कळतही नाही. वारीत बरेच जण आमची आवर्जून विचारपूस करतात. तरूण लोक आम्हाला काही हवे असेल तर ते उत्साहाने आणून देतात. इतकी वर्षे वारी करत असलो तरी वारीबद्दलची ओढ अजूनही कमी झालेली नाही. पांडुरंगाची भक्‍ती आणि लोकांची साथ यामुळेच ही ओढ आजही कायम आहे, असे वाटते.’

Leave A Reply

Your email address will not be published.