अर्थसंकल्पांतील आकड्यांचा फुगवटा कमी होण्याची शक्‍यता

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019 – 2020 या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी (दि.18) स्थायी समिती समोर सादर केला जाणार आहे. विविध नागरी कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळणाऱ्या अनुदानामुळे गेल्या काही वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेत पाच हजार कोटीपर्यंतचा आकडा गाठला होता. मात्र जेएनएनयुआरएम अभियान संपुष्टात आल्याने यंदाचा अर्थसंकल्प जमिनीवर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदाचा वास्तववादी अर्थसंकल्प सादर करत आकड्यांचा फुगवटा कमी होण्याची सर्वाधिक शक्‍यता आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये क्षेत्रीय कार्यालये तसेच महापालिकेतील विविध विभागांची अर्थसंकल्पीय जुळवणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी मूळ 3506 कोटी, तर केंद्राच्या विविध योजनांसह 5263 कोटींचा आणि 181 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला होता. महापालिका आयुक्‍त वेगाने काम करीत नसल्यामुळे गेल्या 11 महिन्यांत विकासाची नवीन कामे झालेली नाहीत, अशी विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांची ओरड आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील बहुतांशी रक्कम अजूनही वापराविना पडून असल्याची आवई देखील उठवली जात आहे.

विविध नागरी कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळणाऱ्या अनुदानामुळे गेल्या काही वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. मात्र जेएनएनयुआरएम अभियान संपुष्टात आल्याने यंदाचा अर्थसंकल्प जमिनीवर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प वास्तववादी असण्याची शक्‍यता आहे. विविध विभाग अनावश्‍यक तरतूदी करतात. त्या तरतुदी खर्चीही पडत नसल्याने वर्गीकरणाची वेळ अनेकदा येते. आगामी अर्थसंकल्पात योग्य प्रकल्प, विकास योजनांवर पुरेशा तरतुदी केल्या जाणार आहेत. फुगीर आकडे अर्थसंकल्पात नसतील. आवश्‍यक तेवढीच कामे शहराच्या हिताच्या दृष्टीने करण्याचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

नागरिकांच्या मागणीचा किती विचार ?
महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांकडून विकास कामे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आवाहनाअंतर्गत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या योग्य सूचना व सुचवलेली विकासकामे प्रशासनाकडून स्वीकारली जातात. ठराविक रकमेपर्यंतच्या कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला जात आहे. या अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेली नेमक्‍या किती कामांचा या अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे, याची नागरिकांनादेखील उत्सुकता आहे.

आयुक्‍त सोडणार का अर्थसंकल्पावर छाप ?
गेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही भरीव विकासकामाचा समावेश न केल्याने महापालिका आयुक्‍तांची त्या अर्थसंकल्पावर छाप नव्हती. मात्र, शहराच्या वैभवात भर घालणारा एखाद्या प्रकल्पाचा या अर्थसंकल्पात समावेश केल्यास, त्यावर आयुक्‍तांची छाप निश्‍चितपणे दिसून येईल. त्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न झाले असल्यास, ते अर्थसंकल्पाचे वैशिष्टय ठरू शकते.

पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असून, विकासकामांच्या जोरावरच जगाच्या नकाशावर या शहराने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शहरात अनेक विकासकामे करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध आहे. त्यानुसार विकास प्रकल्पांचे नियोजन, तरतूद करावी व ते मार्गी लावावेत, अशी अपेक्षा आहे.
जीवन लोंढे, उद्योजक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)