अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, जोकोविच, कर्बर दुसऱ्या फेरीत

न्यूयॉर्क: दोन वर्षांनंतर या स्पर्धेत खेळणारा नोव्हाक जोकोविच व पाच वेळचा माजी विजेता रॉजर फेडरर यांच्यासह चतुर्थ मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह, सातवा मानांकित मेरिन सिलिच व 21 वा मानांकित केई निशिकोरी या पुरुष मानांकितांनी वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. भारताच्या युकी भांबरीचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले.

महिला एकेरीत ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या कॅरोलिन वोझ्नियाकीसह चतुर्थ मानांकित अँजेलिक कर्बर, पाचवी मानांकित पेट्रा क्‍विटोव्हा, 14वी मानांकित मॅडिसन कीज, दहावी मानांकित येलेना ऑस्टापेन्को, सहावी मानांकित कॅरोलिन गार्सिया, 20वी मानांकित नाओमी ओसाका यांच्यासाह पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 22व्या मानांकित मारिया शारापोव्हानेही पहिल्या फेरीची वेस ओलांडली. सेरेना विल्यम्स, व्हीनस विल्यम्स आणि गतविजेती स्लोन स्टीफन्स यांनी याआधीच विजयी सलामी दिली आहे. मात्र बिगरमानांकित काइया कानेपीने अग्रमानांकित सिमोना हालेपवर सनसनाटी मात करताना स्पर्धेतील पहिला खळबळजनक निकाल नोंदविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याआधी जोकोविचने हंगेरीच्या मार्टन फस्कोव्हिक्‍सचा 6-3, 3-6, 6-4, 6-0 असा पराभव केला. मात्र या लढतीदरम्यान असह्य उष्णतेमुळे जोकोविचला “हीट ब्रेक’ घ्यावा लागला. या ब्रेकमध्ये जोकोविचने चक्‍क “आईस बाथ’ घेतला. स्टॅन वॉवरिन्काविरुद्ध 2016 मधील अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर जोकोविच येथे पहिल्यांदाच खेळत आहे. काही दिवसांपूर्वी विम्बल्डन स्पर्धा जिंकून जोकोविचने जबरदस्त कम बॅक केले आहे.

दरम्यान, द्वितीय मानांकित फेडररने जपानच्या योशिहितो निशिओकाचे आव्हान 6-2, 6-2, 6-4 असे मोडून काढत विजयी सलामी दिली. फेडरर व नदालने अमेरिकन ओपनमधील आपल्या 18 व्या वर्षी सर्व 18 वेळा पहिली फेरी जिंकण्याची कामगिरी नोंदविली आहे. फेडरर 2016 मध्ये या स्पर्धेत खेळू शखला नव्हता, तर गेल्या वर्षी तो उपान्त्यपूर्व फेरीत पराभूत झाला होता.

महिला एकेरीत वोझ्नियाकीने समंथा स्टोसूरचा 6-3, 6-2 असा फडशा पाडला. तर अँजेलिक कर्बरने रशियाच्या मार्गारिटा गास्पारिनचे आव्हान 7-5, 6-3 असे मोडून काढले. पाचव्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाने यानिना विकमायरचा 6-1, 6-4 असा पराभव केला. तर 14व्या मानांकित मॅडिसन कीजने पॉलिन पारमेंटियरला 6-4, 6-4 असा बाहेरचा रस्ता दाखविला.
महिला एकेरीतील आणखी एका लढतीत विसाव्या मानांकित नाओमी ओसाकाने लॉरा सिग्मंडचा 6-3, 6-2 असा धुव्वा उडविला. तर दहाव्या मानांकित येलेना ऑस्टापेन्कोने अँड्रिया पेटकोविचचे आव्हान 6-4, 4-6, 7-5 असे मोडून काढत दुसरी फेरी गाठली. सहाव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने इंग्लंडच्या योहाना कॉन्टावर 6-2, 6-2 अशी मात केली. तर मारिया शारापोव्हाने पॅटी श्‍नायजरला 6-2, 7-6 असे नमवीत विजयी सलामी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)