अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सेरेना विल्यम्स व नदालची विजयी सलामी 

न्यूयॉर्क: वर्षातील अखेरची ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा असल्यामुळे खेळाडूंचा कस पाहणाऱ्या अमेरिकन ओपनचा थरार आजपासून सुरू झाला असून महिला गटात अपेक्षेप्रमाणे सेरेना विल्यम्स, व्हीनस विल्यम्स आणि गतविजेती स्लोन स्टीफन्स यांनी विजयी सलामी दिली. मात्र काइया कानेपीने अग्रमानांकित सिमोना हालेपचा सहज पराभव करताना स्पर्धेच्या सुरुवातीलाच खळबळजनक निकालाची नोंद केली. पुरुष विभागात अग्रमानांकित राफेल नदाल, डेल पोट्रो, अँडी मरे आणि स्टॅन वॉवरिन्का यांनी विजयी सलामी दिली.
महिला एकेरीतील पहिल्या फेरीच्या सामन्यात काइया कानेपीने अग्रमानांकित सिमोना हालेपचा 76 मिनिटे रंगलेल्या लढतीत 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सनसनाटी निकालाची नोंद केली. तर दुसऱ्या सामन्यात 16वे मानांकन असलेल्या व्हीनस विल्यम्सने रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाचा 6-3, 7-5, 6-3 असा 2 तास 55 मिनिटे चाललेल्या लढतीनंतर पराभव करत विजयी सलामी दिली.
तसेच 17वे मानांकन असलेल्या माजी विजेत्या सेरेना विल्यम्सने पोलंडच्या मेग्डा लिनेटचा 6-4, 6-0 असा सहज आणि सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत यशस्वी पुनरागमन केले. यावेळी आणखी एका सामन्यात तिसरे मानांकन असलेल्या स्लोन स्टीफन्सने रशियाच्या बिगरमानांकित एव्हगेनिया रॉडिनाचा 6-1, 7-5 असा पराभव करताना सलग दुसऱ्या विजेतेपदाकडे आगेकूच सुरू केली.
पुरुष एकेरीत अग्रमानांकित राफेल नदालने स्पेनच्याच डेव्हिड फेररवर 6-3, 3-4 असा विजय मिळवला. नदाल दुसऱ्या सेटमध्ये आघाडीवर असताना फेररने दुखापतीमुळे माघार घेतल्याने पंचांनी नदालला विजयी घोषित केले. हा सामना 83 मिनिटे चालला. पुरुष एकेरीतील दुसऱ्या सामन्यात स्टॅन वॉवरिन्काने आठवे मानांकन असलेल्या बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमित्रोव्हचा 2 तास 24 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-3, 6-2, 7-5 असा पराभव करताना विजयी सलामी दिली.
तिसऱ्या सामन्यात अँडी मरेने ऍस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा 3 तास आणि 17 मिनिटे चाललेल्या झुंजीनंतर 6-7 (5-7), 6-3, 7-5, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. तसेच अन्य एका सामन्यात तिसरे मानांकन असलेल्या जुआन डेल पोट्रोने अमेरकेच्या डोनाल्ड यंगचा 6-0, 6-3, 6-4 असा सहज पराभव करत दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)