अमृतात भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज

दुधात भेसळीचे वाढले प्रमाण; अन्न भेसळच्या अर्थकरणात सामान्यांचा जीव टांगणीला

प्रशांत जाधव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा, दि. 27
दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. दूध टिकून राहण्यासाठी भेसळखोर त्यात अनेक रासायनिक पदार्थ मिसळतात. त्यातून अनेक गंभीर आजार होण्याचा धोका आहे. अन्न व भेसळ विभागाने टाकलेल्या 13 छाप्यातून आजही दुधासारख्या अमृतात विषाची भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र फक्त छाप्यापुरते मर्यादीत न राहता व कोणतेही हितसंबंध न जोपासता कारवाई मुळापर्यंत गेली तरच भेसळखोरांच्या मुसक्‍या आवळल्या जातील. अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी कारवाई करत आहे पण कारवाईचा बार फुसका निघत असल्याने दूध भेसळखोरांचे चांगलेच फावले आहे.

निर्जंतुक, निर्भेळ व दर्जेदार दूध खाण्यास मिळावे ही ग्राहकांची अपेक्षा असते. याच अपेक्षेने ग्राहक दूध विकत घेत असतो. मात्र, अलीकडे हेच अमृत (दुध) भेसळीमुळे विष बनत असल्याचे वास्तव आहे.

दूध संकलन केंद्रे आणि दूध प्रक्रिया संस्थांत होणारी भेसळ ही गंभीर बाब असून त्यावर अंकुश ठेवणारी प्रभावी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. माण तालुक्‍यातील श्रीराम दुध संकलन केंद्र बिजवडी, संकल्प दुध डेअरी धुळदेव, सोनाई चिलिंग सेंटर मोही तर खटाव तालुक्‍यातील श्रीराज दुध संकलन केंद्र चोराडे, जय मिल्क धारपुडी,पृथ्वीराज मिल्क बनपुरी, कोरेगाव तालुक्‍यातील सिध्दकला मिल्क धामणेर, वंगणा दुध हिवरे, साई दुध संकलन नायगाव, पश्‍चिम महाराष्ट्र मिल्क चिमणगाव, फलटण तालुक्‍यातील कृष्णराज दुध फडतरवाडी, तानाजी शंकर गाढवे वाई, जे.के. मिल्क कोडोली,सातारा या दुध संकलन केंद्रावर अन्न भेसळ विभागाने जानेवारी महिन्यात छापा टाकत भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त केले होते. त्यावरून दुधात भेसळ करणारी यंत्रणा जिल्ह्यात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले होते. दूध उत्पादक, दूध संकलन केंद्रे, दूध संघ याठिकाणी प्रामुख्याने दूध भेसळ होताना समोर येत आहे.

असे असताना अन्न भेसळ विभागाच्या कारवाईत मात्र सातत्य राहयला पाहीजे मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. केवळ कागदोपत्री देखावा करण्यासाठी कारवाईचा फार्स करायचा त्यानंतर मात्र तु कर मारल्यासारखे मी करतो रडल्यासारखे असा कारभार सुरू आहे.

 

अशी होते भेसळ…
दूध उत्पादक व प्राथमिक दूध संकलन केंद्रावर दुधाचे माप वाढविण्यासाठी पाणी मिसळले जाते. पाण्याच्या भेसळीमुळे दुधातील फॅट (स्निग्धांश) कमी होऊ नयेत, म्हणून यात पुन्हा रिफाईन खाद्य तेल, सोयाबीन तेल, वनस्पती तूप किंवा पामतेलाचा वापर केला जातो. दुधाचे माप वाढल्यामुळे त्यातील एसएनएफ (घनपदार्थ विरहित स्निग्ध) कमी होते. हे टाळण्यासाठी त्यामध्ये लॅक्‍टोज, साखर, ग्लुकोज तसेच पीठ व मैदा अशा प्रकारचे स्टार्च; मीठ, युरिया, स्कीम मिल्क (दुधाची) पावडरची भेसळ करण्यात येते. ग्रामीण भागात शक्‍यतो प्रत्येक दिवशी एकाच वेळेला दूध संकलन होते. अशा ठिकाणी दूध टिकून ठेवण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, निरमा, युरिया असे पदार्थ मिसळले जातात.

भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम…
युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यांसारखे अवयव निकामी होण्याची भीती असते. कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्‍यक असणारे लायसिन हे अमिनो आम्ल शरीराला मिळत नाही. परिणामी लहान मुलांच्या शरीराची वाढ खुंटते. यामधील सोडियमसारख्या घटकाचा मानवी शरीरावर दूरगामी परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार बळावू शकतात. भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. त्यामुळे दूध भेसळीच्या अर्थकारणात सामान्यांच्या जीवाचे बरे वाईट होणार नाही याची काळजी अन्न भेसळ विभागाच्या वरिष्ठांनी घेतलेली बरी.

1 COMMENT

  1. उत्पादक पाणी मिसळ्याचे थांबत नाहीत तोपर्यंत असेच होणार.
    दुधात पाण्याची भेसळ रोखण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)