अमित पांघाल, विकास कृष्णन उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

जकार्ता: सलग तिसऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेत पदकासाठी प्रयत्नशील असलेला भारतीय मुष्टियोद्धा विकास कृष्णनने पाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी मात करताना पुरुषांच्या 75 किलो गटातील उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. सलग तिसऱ्या पदकाची निश्‍चिती करण्यासाठी विकासला आणखी केवळ एका विजयाची गरज आहे. या स्पर्धेत पदक जिंकल्यास पदकाची हॅटट्रिक करणारा तो पहिला भारतीय मुष्टियोद्धा ठरेल.
याआधी 2010 आणि 2014 आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या विकासने उपउपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत पाकिस्तानच्या तन्वीर अहमदचे आव्हान 5-0 असे मोडून काढत आगेकूच केली. विकासच्या जबरदस्त ठोशांसमोर तन्वीर बहुतेक वेळा निष्प्रभ झाल्याचे दिसत होते. पंचांनी त्याच्याविरुद्ध दोन वेळा काऊंटही दिले. त्यानंतर तन्वीरच्या ठोशामुळे विकासच्या डाव्या डोळ्याजवळ छोटी जखमही झाली. परंतु विकासवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या विकाससमोर उपान्त्यपूर्व फेरीत चीनच्या तुओहेता एर्बिएके तांग्लातिहान याचे आव्हान आहे.
दरम्यान अमित पांघालनेही 49 किलो गटांच्या उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना भारताची मुष्टियुद्धातील आगेकूच कायम राखली. अमितने संथ प्रारंभानंतर मंगोलियाच्या एन्खमंदाख खारहू याच्यावर मात केली. पंचांनी एकमताने अमितच्या बाजूने कौल दिला. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यविजेत्या अमितसमोर उपान्त्यपूर्व फेरीत उत्तर कोरियाच्या किम जॅंग रयोंगचे आव्हान आहे.
व्हॉलीबॉलमध्ये महिलांचे आव्हान संपुष्टात 
महिलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग पाचव्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय महिला संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आज पार पडलेल्या ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिला संघाला चीनविरुद्ध 0-3 असा पराभव पत्करावा लागला. एकूण 67 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात चीनने भारतीय महिला संघावर 25-18, 25-19, 25-9 अशी मात केली. दरम्यान भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघासमोर उद्या होणाऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान आहे. भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने हॉंग कॉंग व मालदीव यांच्यावर मात करताना एफ गटात दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली. भारतीय पुरुष संघाला केवळ कतारविरुद्धच्या गटसाखळी लढतीत पराभव पत्करावा लागला.
सेपक टकरावमध्ये पुरुष संघाचा विजय 
पहिल्या दोन गटसाखळी लढतीतील सलग दोन पराभवांमुळे स्पर्धेतील आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या भारतीय पुरुष संघाने अखेरच्या गटसाखळी सामन्यात नेपाळचा 2-0 असा पराभव करताना सेपक टकराव स्पर्धेची विजयी सांगता केली. रूपेश कुमार, दीपेश जंग थापा, गोविंदा मगर, संजीत दुमाळ व रेबिन भट्टराय यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष सेपक टकरावच्या ब गटसाखळीत कोरिया व मलेशियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. परंतु आज अखेरच्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने नेपाळला 21-5, 21-15 असे पराभूत केले. सेपक टकराव हा खेळ व्हॉलीबॉलच्याच धर्तीवर खेळला जात असून त्यात पाय व मस्तकाचा उपयोग करून चेंडू मारायचा असतो. या खेळात हातांचा उपयोग करण्यास बंदी असते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)