‘अभिमत’साठी ‘सीओईपी’ची अजूनही धडपड!

व्यंकटेश भोळा 

यूजीसीकडून वारंवार नकार 


स्वायत्तता असूनही उपयोग काय?

पुणे – फर्गसन आणि बीएससीसी या स्वायत्त महाविद्यालयांनी स्वतंत्र विद्यापीठासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, राज्यात सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात ‘सीओईपी’ला गेल्या सात-आठ वर्षापासून ‘अभिमत विद्यापीठ’ दर्जासाठी झगडावे लागत आहे.

‘सीओईपी’ची गुणवत्ता आणि क्षमता पाहता अभिमत दर्जा यापूर्वीच मिळायला हवा होता. याबाबत पाठपुरावाही सुरू आहे. अभिमत विद्यापीठासाठी लागणारे सर्व निकषांत बसणारी संस्था आहे. आता पुन्हा एकदा सुधारित प्रस्ताव 15 दिवसांपूर्वी यूजीसीकडे सादर केला आहे. त्यात हा प्रस्ताव ग्राह्य धरावा, अशी मागणी केली आहे.
– बी. बी. आहुजा, संचालक, ‘सीओईपी’

शैक्षणिक दर्जा आणि क्षमता असूनही ‘सीओईपी’चे अभिमत विद्यापीठाचे स्वप्न अजूनही अंधातरीच असल्याचे दिसून येत आहे. ‘सीओईपी’चे तत्कालीन संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवित आहेत. एवढेच नव्हे, तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हेही पुण्याचे असूनही, आजमितीला विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीकडून “सीओईपी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा का मिळत नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

‘सीओईपी’ला हा दर्जा देण्यास एवढी प्रतीक्षा का करावी लागत आहे? त्याचे कारण अजून अस्पष्ट आहे. “सीओईपी’ला यापूर्वीच स्वायत्त दर्जा मिळाला आहे. स्वायत्त संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार स्वायत्त असलेल्या संस्थांना देशात यापूर्वीच अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिल्याची उदाहरणे आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर “सीओईपी’ने वेळावेळी यूजीसीकडे पाठपुरावा केला. पण, त्यात अपयश येत आहे.

तांत्रिक कारणांची अडचण
“सीओईपी’ने पुन्हा एकदा 2014 साली यूजीसीकडे सुधारित प्रस्ताव पाठविला. त्यानंतर मागील महिन्यात यूजीसीने हा प्रस्ताव नाकारल्याचे पत्र सीओईपीला पाठविले आहे. या प्रस्तावात “सीओईपी’कडे “सेंटर ऑफ एक्‍सलन्स’ नसल्याच्या कारणावरून हा दर्जा देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. यूजीसीच्या दरवेळच्या तांत्रिक कारणाने अभिमत विद्यापीठाचा दर्जा रखडला असल्याचे “सीओईपी’चे म्हणणे आहे.

दर्जा मिळण्याची अजूनही अपेक्षा
“सीओईपी’चे संचालक बी. बी. आहुजा म्हणाले, यूजीसीने “सीओईपी’त सेंटर ऑफ एक्‍सलन्स’ नसल्याचे नमूद केले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून “सीओईपी’त “स्मार्ट रिन्युव्हेबल एनर्जी सिस्टिम’ व “सिग्नल ऑफ इमेज प्रोसेसिंग’ ही सेंटर कार्यरत आहेत. तसेच संशोधनाच्या पातळीवर सर्व निकष पूर्ण केलेली संस्था आहे. यूजीसीच्या समितीने कॉलेजची पाहणी केली आहे. यूजीसीच्या पत्रावरून त्रुटींची पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव यूजीसीकडे पाठविला आहे. त्यामुळे आम्हाला हा दर्जा मिळेल, अशी आशा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)