अभिनयसहजतेचा बादशहा

श्रद्धांजली
मानवेंद्र उपाध्याय
सिनेसमीक्षक

कादर खान यांनी जवळजवळ 300 चित्रपटांतून अभिनय केला. कोणत्याही भूमिकेत ते चपखल बसत, हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि त्यांच्या अभिनयात सहजता होती. त्यांचा खलनायक जितका क्रूर आणि चीड आणणारा असे, तितक्‍याच त्यांच्या विनोदी भूमिका हसवणाऱ्या असत. या दोन्ही टोकाच्या भूमिका करताना कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश त्यात नसे. म्हणजे खलनायकाची व्यक्‍तिरेखा रंगवताना त्यांना आपल्या मेकअपमध्ये काहीही बदल करावा लागला नाही. त्यांचा पडद्यावर अगदी स्वाभाविक असा वावर होता. ते जी व्यक्‍तिरेखा साकारत तसेच ते आहेत, असे वाटावे, इतका त्यांचा अभिनय खरा वाटत असे.!

कादर खान मूळचे काबूलचे, अफगाणिस्तानमधले. त्यांचा जन्म काबूलमध्ये झाला. 22 ऑक्‍टोबर 1937 ही त्यांची जन्मतारीख. त्यांचे वडील अब्दुल रहमान खान आणि आई इक्‍बाल बेगम. या दांपत्याची मुले जगत नसत. तीन मुलांचे निधन झाल्यानंतर चौथ्या मुलाच्या, म्हणजे कादर खान यांच्या जन्मानंतर त्यांनी काबूल सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि दरमजल दर करत ते मुंबईत आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईतही कामाठीपुऱ्यात राहणे त्यांच्या नशिबी आले. तिथल्या वातावरणाचा त्यांना उबग आला. अब्दुल रहमान खान आणि इक्‍बाल बेगम यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर इक्‍बाल बेगम यांनी दुसरा विवाह केला. पण त्यांचे दुसरे पतीही गरीबच होते. त्याच वातावरणात कादर खान मोठे होत होते. गरिबीतही त्यांचे शिक्षण सुरू होते आणि अभ्यासात ते चांगले हुशारही होते. शालेय शिक्षण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या इस्माईल युसूफ कॉलेजमधून ते पदवीधर झाले. त्यानंतर इंजिनियरिंगची पदवीही त्यांनी घेतली. त्यानंतर भायखळ्यातील एम. एच. साबू सिद्दीकी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरीही सुरू केली.

कॉलेजमध्ये असतानाच नाटक, एकांकिका यांच्याशी त्यांचा संबंध आला. साहित्याची त्यांना आवड होतीच. कॉलेजमधील नाटकांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. एकदा कॉलेजच्या स्नेहसंमेलनातील एका नाटकात त्यांनी काम केले होते. त्या स्नेहसंमेलनासाठी अभिनेता दिलीपकुमार प्रमुख पाहुणे होते. त्यांना कादर खान यांचा अभिनय आवडला. आणि त्यांनी त्यांच्या सगीना या चित्रपटात काम करण्याबाबत त्यांना विचारले. या चित्रपटातील भूमिकेनंतर कादर खाननी हिंदी चित्रपटसृष्टीत पाय रोवण्याचे ठरवले आणि त्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर त्यांची दिल दीवाना, बेनाम, उमरकैद, अनाडी आणि बैराग असे चित्रपट आले. 1977मध्ये खून पसीना आणि परवरीश हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांद्वारे एक अभिनेता म्हणून कादर खान यांची ओळख चित्रपटसृष्टीत दृढ होऊ लागली.

मुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल, सुहाग, अब्दुल्ला, दो और दो पांच, लूटमार, कुर्बानी, याराना, बुलंदी आणि नसीब यासारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये कादर खानना महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या होत्या. हे चित्रपटही बॉक्‍स ऑफिसवर चांगलेच गाजले आणि मग कादर खानही बड्या कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसले. खलनायक म्हणून चित्रपटसृष्टीत ते प्रस्थापित झाले. 1983मध्ये प्रदर्शित झालेल्या कुली या चित्रपटात कादर खान यांनी साकारलेला खलनायक सर्वाधिक गाजला.

नव्वदच्या दशकात कादर खान विनोदी आणि चरित्र व्यक्तिरेखांकडे वळले. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या “बाप नंबरी बेटा दस नंबरी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट मानावा लागेल. या चित्रपटात कादर खान आणि शक्ती कपूर यांनी पिता आणि मुलगा अशा भूमिका केल्या होत्या. हा विनोदी चित्रपट होता आणि दोघांच्याही भूमिका विनोदी होत्या. या चित्रपटातील भूमिकेसाठी कादर खान यांना फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला. 1982मध्ये प्रदर्शित झालेल्या अंगार या चित्रपटात त्यांनी साकारलेली अंडरवर्ल्ड डॉन जहांगीर खानची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण मानावी लागेल.

नव्वदच्या दशकात विनोदी अभिनेता म्हणूनही कादर खान यांनी आपले स्थान पक्के केले. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या दुल्हे राजा या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकांना खूप आवडली.कादर खान यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांची जोडी अभिनेता शक्ति कपूर यांच्याबरोबर चांगलीच गाजली. या दोघांनी सुमारे 100 चित्रपटांत एकत्र काम केले. अनेक चित्रपटांचे संवाद लेखनही कादर खान यांनी केले आहे. कादर खान यांनी जवळजवळ 300 चित्रपटांतून अभिनय केला. कोणत्याही भूमिकेत ते चपखल बसत, हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि त्यांच्या अभिनयात सहजता होती. त्यांचा खलनायक जितका क्रूर आणि चीड आणणारा असे, तितक्‍याच त्यांच्या विनोदी भूमिका हसवणाऱ्या असत. या दोन्ही टोकाच्या भूमिका करताना कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश त्यात नसे. त्यांचा पडद्यावर अगदी स्वाभाविक असा वावर होता.

संवाद लेखक म्हणूनही त्यांनी 250 चित्रपट लिहिले, त्यातील प्रमुख चित्रपट होते सुहाग, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी, शराबी, कुली, सत्ते पे सत्ता, देशप्रेमी, मि. नटवरलाल, परवरीश, खून पसीना वगैरे. आपल्या काळातील सर्व बड्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)