अबाऊट टर्न: होयबा

हिमांशू

तुम्ही “नायक’ चित्रपट पाहिलाय का? “”आप कह रहे है तो ठीक ही होगा,” असं या चित्रपटात एक कार्यकर्ता मुख्यमंत्र्यांना उद्देशून नेहमी म्हणत असतो. आपला नेता चुकीचा असूच शकत नाही, हे त्याचं ठाम मत असतं आणि तेच इतरांचंही असावं, यासाठी तो “आपल्या स्टाइलनं’ प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. सहसा अशा व्यक्‍तींना आपण “होयबा’ म्हणून ओळखतो. हे लोक सगळ्याच क्षेत्रांत आढळतात. विशेष म्हणजे, अशाच व्यक्‍तींची प्रगती होताना दिसते. हे वाचताक्षणी अनेकांना आपले ऑफीस आठवले असेल, याची आम्हाला खात्री आहे.

“बॉस इज ऑलवेज राइट,’ म्हणजे बॉस नेहमी बरोबरच असतो, असा “नियम’ आहे, हे खुद्द एका बॉसनेच आम्हाला मध्यंतरी सांगितले होते. (ते सांगायची वेळ आम्ही बॉसवर आणली, हा आमचा प्रमाद!) दुपारी चहा घेता-घेता या नियमाची खिल्ली उडवताना (अर्थात बॉसच्या माघारी) आमच्यातला एकजण म्हणाला होता, “”हा नियम क्रमांक एक आहे. नियम क्रमांक दोन असा ः जर बॉसचे चूक असेल, तर… कृपया नियम क्रमांक एक पाहा!” बॉसच्या समोर होयबागिरी करून अनेकांनी इन्क्रिमेन्ट, प्रमोशन मिळवल्याची उदाहरणे हे वाचता-वाचताच तुमच्या डोळ्यापुढे येतील. असे वागले तर आपली प्रगती तर झपाट्याने होईलच; शिवाय त्यासाठी गुणवत्ता दाखवण्याचीही गरज नाही, असा काहीजणांचा ठाम समज आहे.

बॉस चुकूच शकत नाही, हा “नियम’ म्हणून कधीपासून सांगितला जाऊ लागला, हे ठाऊक नाही; परंतु या नियमामुळे ना बॉसचे भले होते, ना त्याला “राइट’ म्हणणाऱ्याचे आणि ना संस्थेचे… हे मात्र निश्‍चित! पूर्वी संस्कृत नाटकांमध्ये एक विदूषक असायचा. राजा त्याला मित्र मानायचा आणि राजाचा निर्णय चुकत असेल, तर तसे सांगण्याचा अधिकार विदूषकाला असायचा. विदूषकाचे म्हणणे राजा ऐकेलच असे नाही; पण किमान ते मत मांडू दिले जायचे. अर्थात, राजा आणि विदूषक दोघेही नाटकातले! प्रत्यक्षात आपले कधी, काही चुकूच शकत नाही, असे मानणारे राजेरजवाडेच अधिक असणार. म्हणजेच, होयबा संस्कृतीला मोठा इतिहास असणार.

हल्ली त्याचे काही नमुने राजकारणात पाहायला मिळतात. कुणी नेत्याची चप्पल उचलताना दिसतो, तर कुणी नेत्याच्या चेहऱ्यावरचा घाम स्वतःच्या रुमालाने पुसताना दिसतो. नेत्यांची देवळे बांधणारे महाभागही आहेत. नेत्याला ईश्‍वर मानले तर राजकीय वाटचाल सुकर होते. आंध्र प्रदेशाचेच उदाहरण घ्या. श्रीधर रेड्डी नावाच्या आमदाराने “ईश्‍वराला साक्षी ठेवून’ असे न म्हणता “जगनमोहन रेड्डी यांना साक्षी ठेवून’ पदाची शपथ घेतली. नेत्यांना देवपण बहाल करण्याची अनेक व्यासपीठे उपलब्ध असताना शपथग्रहण समारंभाची निवड करण्याचे कारण काय?

या आमदाराला पुन्हा शपथ घ्यावी लागली, हा भाग वेगळा. पण, नेत्याला देव करण्यासाठी सभागृहाची परंपरासुद्धा मोडण्याच्या या कृतीविषयी या महाशयांना जेव्हा विचारले, तेव्हा त्यांनी पूर्वीचे दाखले तोंडावर फेकले. तेलुगू देसमच्या काही आमदारांनी म्हणे पूर्वी एन. टी. रामाराव यांचे नाव घेऊन शपथ घेतली होती. त्याची आठवण करून देत महाशय म्हणतात, “”सामान्य कुटुंबातला असूनसुद्धा मला दोनदा आमदार करणारा नेता माझा देवच!” आता बोला!

Leave A Reply

Your email address will not be published.