#अबाऊट टर्न: संवेदन-स्क्रीन 

– हिमांशू 
जग खरंच लहान झालंय. खूप खूप लहान. मोबाइलच्या अवघ्या पाच इंची स्क्रीनमध्ये सामावून जग खिशात जाऊन बसलं आणि खिशामागची आमची छाती तंत्रसमृद्धीनं फुगली. अगदी इसापनीतीतल्या बेडकासारखी. त्या बेडकाचा आकार बैलाएवढा काही केल्या करता येईना. कारण फुगलेल्या त्या छातीतलं आमचं अंतःकरण इतकं संकोचलं, की आमचं आम्हालाच सापडेना. आवडत्या रिंगटोनच्या आवाजानं दबून गेली त्यामागच्या हृदयाची धडधड. स्वतःची स्वतःलाही ती ऐकू येईना. मग त्या छातीवर कुणी अपेक्षेनं डोकं टेकवलं तर त्याला ती कशी ऐकू यावी? त्याला जाणवतं फक्त व्हायब्रेशन.
कारण आमच्या जाणिवा सायलेन्ट मोडवर गेलेल्या आणि अपेक्षा, कामना, वासना आणि महत्त्वाकांक्षा थरथरून जाग्या झालेल्या. जगाला गवसणी घालू पाहणाऱ्या या महत्त्वाकांक्षा जगाबरोबरच मोबाइलमध्ये बंदिस्त झाल्या आणि ते आभासी जग वास्तव जगापेक्षा मोठ्ठं दिसू लागलं. खऱ्यापेक्षा अधिक खरं वाटू लागलं. डोळ्यात डोळे घालून केलेला संवाद, जोडलेली नाती खूपच लहान वाटू लागली…. केविलवाणी! गतीशी दोस्ती आणि भीतीशी प्रीती जडली. आपल्यावर कुणीतरी मागासलेपणाचा आळ घेईल या भीतीनं धावत सुटलो. डावा हात छातीवर ठेवला… खिशातला मोबाईल पडू नये म्हणून! बराच वेळ खिशात व्हायब्रेशन जाणवलं नाही, तरी भीती वाटते. भरगर्दीत एकटं पडल्यासारखं वाटतं. टचस्क्रीन भलताच संवेदनशील.
बोट लावताच विश्‍वरूप दर्शन घडवणारा. मग वात्सल्यसिंधू म्हणा किंवा प्रेमस्वरूप म्हणा, या शब्दांना या विश्‍वरूपापुढे काय अर्थ उरतो? भले हे शब्द आईसाठी वापरले असतील, भले अनेक कवींना आईवर कविता केल्याशिवाय इतिकर्तव्यता झाल्यासारखं वाटलं नसेल; पण आमच्या विश्‍वरूप टचस्क्रीनपेक्षा आई मोठी कशी होईल? या स्क्रीनपेक्षा का संवेदनशील असते आई? आम्ही शरीरानं आईपासून दूर गेलो असलो, तरी या संवेदनशीलतेनं जोडलेलो असतोच की! मग आईचं अंत्यदर्शनसुद्धा याच टचस्क्रीनवर घडावं असं कुणाला वाटलं तर चुकलं कुठं? पालघरसारख्या दुर्गम जिल्ह्यात, त्यातल्या त्यात मनोरसारख्या डोंगरी भागातल्या चाळीतल्या खोल्यांमध्ये असेल एखादं गुजराती-पारसी वृद्ध जोडपं. असेल त्यांना एकुलती एक लेक. आईचा प्राण जाताना नसेल लेक जवळ.
अहमदाबादच्या गजबजाटात गेली असेल बिचारी हरवून. असेल अवघं सहाच तासांचं अंतर. पण म्हणून रुटीन बदलून आईचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ही सहा तासांची यातायात का करावी तिनं? तेही विश्‍वरूप दर्शन घडवणारा टचस्क्रीन डोळ्यांसमोर असताना? छे, छे… भलतंच अव्यवहार्य! येण्या-जाण्याचा खर्च, अंत्यसंस्कारांचा खर्च, आल्या-गेलेल्यांशी भेटणं-बोलणं… कोरड्या डोळ्यांमधून अश्रू गाळल्याचं ते नाटक… कशासाठी? गाववाल्यांनीच एकत्र येऊन जाळावं त्या मातेला आणि घडवावं अंत्यदर्शन मुलीला व्हिडिओ कॉलमार्फत!
आईच्या अस्थी न्यायला तरी का यावं या एकुलत्या लेकीनं? सावडण्याच्या विधीला कमी वेळ लागतो का? शिवाय, कुरिअर सेवा आहेतच की आपल्या देशात. दुर्गम भाग असला म्हणून काय झालं? चार दिवस इकडंतिकडं होतील; पण अस्थी पोहोचतीलच लेकीपर्यंत! अजातशत्रू असणाऱ्या कवीमनाच्या नेत्याच्या अस्थीही पोहोचल्याच की, प्रत्येक शहरात. म्हणून काय त्या नेत्याच्या महानतेला स्मरून आम्ही मोबाईलचं विस्मरण होऊ द्यावं की काय? घेतली असेल एखाद्या शहराच्या उपमहापौरांनी अस्थिकलशासोबत सेल्फी… बिघडलं कुठं?
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)