#अबाऊट टर्न: शाप 

“अती झालं आणि हसू आलं’ असं म्हणता-म्हणता हसूच अती झालं आणि अखेर “अती तिथं माती’ झाली. पण आयुष्याची माती व्हायची वेळ आली तरी माती खायची सवय जात नाही, अशी दारूण अवस्था. निंदानालस्ती, शेरेबाजी, खोटारडेपणा, अनावश्‍यक प्रेम, द्वेष, पराकोटीचा मत्सर आणि बेअक्‍कलपणातून सवड मिळालीच तर आपण सगळेजण मिळून या अवस्थेकडे एकदा गांभीर्यानं पाहायला हरकत नसावी. कोणतीही गोष्ट नीट वापरता न येणारा समाज, असा शिक्का कपाळावर मारून घ्यायचं आपण ठरवलंच असेल, तर मात्र अवघड आहे.
मतं आणि भावना खुलेपणानं व्यक्त करण्यासाठी आपल्याला सोशल मीडियाचं वरदान काही वर्षांपूर्वी मिळालं आणि अत्यल्प काळात तोच आपल्यासाठी मोठा शाप बनला. तंत्रज्ञान बोटावर खेळवता-खेळवता आपण व्हर्च्युअल विश्‍वच खरं विश्‍व मानून बसलो. त्यातच रमलो आणि स्मार्टफोनच्या चौकटीबाहेर जग आहे, हेच विसरलो. तेही ठीक; पण गळ्याला फास लागायची वेळ आली तरी हे माध्यम गांभीर्यानं वापरण्याचं शहाणपण का येत नाही, हा प्रश्‍न आपण स्वतःला आजच विचारला नाही, तर उद्याच्या जगाची कल्पना करणंही भीतिदायक आहे. “भावना दुखावल्या’ म्हणून सातत्यानं रस्त्यावर येणारे आपण आज सोशल मीडियावरून क्षणाक्षणाला दुसऱ्यांच्या भावना दुखावण्यात आघाडी घेतलीय. कुणाची कुचेष्टा कशी आणि कोणत्या प्रकारे करायची, याला काही धरबंधच उरलेला नाही. पूर्वी “व्हायरल’ शब्द केवळ आजारांसंदर्भात तोंडी यायचा. आता हा शब्दच मोठा आजार बनलाय.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं आपल्याला कॅन्सर झाल्याचं सोशल मीडियावरून स्वतः सांगितलं. पण विघ्नसंतोषी मंडळींनी त्याचंही भांडवल केलं. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या नावानं मेसेज व्हायरल करून अशा प्रकारचा कॅन्सर टाळण्यासाठी काय करायचं, याचे अत्यंत अशास्त्रीय उपाय सांगितले गेले. हा मेसेज बोगस असल्याचं स्पष्टीकरण टाटा हॉस्पिटलला द्यावं लागलं. विकृत मनोवृत्ती गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या सेलिब्रिटींनाही सोडत नाही, हा निर्लज्जपणा ठरतो. गेल्या वर्षी एका भरभक्कम पोलीस निरीक्षकाला त्याच्या वजनावरून “ट्रोल’ केलं जात होतं. मुंबईत बंदोबस्तासाठी आलेल्या या अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल करून “हेवी बंदोबस्त इन मुंबई टुडे’ अशी शेरेबाजी करण्यात आली होती. 180 किलो वजन असलेल्या या निरीक्षकानं उपचार घेऊन आपलं वजन तब्बल 75 किलोंनी कमी केलं. मात्र, तरीही आपले जुने फोटो फिरवून शेरेबाजी सुरूच असल्याचं पाहून या निरीक्षकानं कपाळावर हात मारून घेतला. रजा-सुट्या न घेता बंदोबस्ताला धावणाऱ्यांची अशी कुचेष्टा होते.
आपलं रक्षण करणाऱ्यांना आपण सोडत नाही, तसंच ओढाताणीनं ग्रासलेल्या आपल्या जीवनातला ताणतणाव कमी करणाऱ्यांनाही सोडत नाही. लहान-थोरांना हसवणारे “मिस्टर बीन’ म्हणजेच अभिनेते रोवन ऍटकिन्सन यांना सोशल मीडियानं एकदा नव्हे, दोनदा स्मशानात पोहोचवलं. लॉस एंजलिसमध्ये झालेल्या अपघातात त्यांचं निधन झाल्याची अफवा जगभर पसरली. अशा वेळी खुलाशांपेक्षा मूळ बातमीचा वेग कितीतरी अधिक असतो. म्हणूनच पोटासाठी गावोगाव फिरणाऱ्या माणसांना मुलं पळवणारी टोळी म्हणून जीवे मारलं जातं. अफवांच्या आगीची झळ आपल्या घरापर्यंत पोहोचायची वाट पाहायची का, एवढाच प्रश्‍न!
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)