#अबाऊट टर्न: भरती

– हिमांशू

पदाचे नाव : शिपाई-संदेशवाहक (प्यून-मेसेंजर).
पात्रता : इयत्ता पाचवी उत्तीर्ण.
अनिवार्य कौशल्य : सायकल चालविता येणे आवश्‍यक.
पदांची संख्या : 62…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर प्रदेशच्या टेलिकॉम शाखेनं ही जाहिरात प्रसिद्ध केली आणि अपेक्षेप्रमाणं… नव्हे अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक संख्येनं अर्जांचा ढीग येऊन पडला. अर्थात, ही काही नवीन बाब नाही. एका जागेसाठी हजारो अर्ज येणं नित्याचंच झालंय सध्या. परंतु या शिपाई-संदेशवाहक पदाच्या भरतीचं एक खास वैशिष्ट्य आहे. या 62 पदांसाठी एकंदर 93 हजार अर्ज आल्यामुळं गरज नसतानाही सगळ्यांना आता लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण अर्ज करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचाच भरणा अधिक आहे. ब्रिटिशांनी कारकून बनवणारी शिक्षणपद्धती भारतात रुजवली आणि मग कौशल्याची गरज असलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारच मिळेनासे झाले, असं आपण म्हणत राहिलो. नंतर नव्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार शिक्षणपद्धती विकसित करण्याचा प्रयत्न झाला.

परंतु, संदेशवाहक नावाच्या या पदासाठी 3,700 अर्ज असे आले आहेत, ज्या उमेदवारांनी डॉक्‍टरेट पदवी मिळवलीय! हो, पीएच. डी! डॉक्‍टरेटचं इतकं अवमूल्यन होईल, असं कुणाला तरी वाटलं असेल का? जमाना बदलला, त्यानुसार आवश्‍यक कौशल्यं बदलली, ती आत्मसात करायला हवीत, इथंपर्यंत ठीक आहे. परंतु जमाना बदलला तरी संदेशवाहकपद तसंच राहिलं ना! त्यासाठी पाचवी पास एवढ्याच किमान आणि कमाल शिक्षणाची गरज आहे. विशेष म्हणजे, एका क्षणात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संदेश पाठवणं जिथं शक्‍य झालंय, तिथं दूरसंचारसारख्या विभागात आजही हे पद कायम आहे. या पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीचं काम काय? टेलिकॉम विभागाचे निरोप एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पोहोचवायचे… तेही सायकलवरून!

या पदासाठी प्रदीर्घ काळानंतर, म्हणजे बारा वर्षांनंतर भरती होत आहे. या बारा वर्षांत संदेशवहनाच्या पद्धती किती बदलल्यात, हे खुद्द टेलिकॉम विभागालाच माहीत नाही की काय? असो! काही गोपनीय निरोप असे असू शकतात, जे पर्सन टू पर्सन पोहोचवणंच गरजेचं असावं. म्हणजे, एका अर्थानं या पदावर नियुक्ती होणारी 62 माणसं पोस्टमनसारखं काम करणार. म्हणूनच त्यांना सायकल चालवता येते की नाही, हे पाहिलं जातंय. या सायकलधारी संदेशवाहकाला दरमहा 20 हजार वेतन मिळतं. ही पूर्णवेळ नोकरी आहे; शिवाय सरकारी! त्यामुळं बेरोजगार तरुणांच्या उड्या पडणार, हे उघड आहे. परंतु 93 हजार 500 अर्ज येण्यामागं एवढं एकच कारण असावं?

कल्पना करा, 3,700 डॉक्‍टरेट लेखी परीक्षा देत आहेत. आजूबाजूला सर्व शाखांचे पदवीधर आहेत. त्यात एमबीए आणि बीटेक झालेल्यांचाही समावेश मोठ्या संख्येनं आहे. काही दहावी पास, काही पाचवी पास पोरंही आहेत. सगळ्यांचं लक्ष पेपरमध्ये आहे; पण डोळ्यांपुढं दिसतेय, एक सायकल! चढ-उताराच्या, कच्च्या-पक्‍क्‍या रस्त्यांवरून धावणारी. पॅडल मारून-मारून चेहऱ्यावर साचलेला घाम… चष्म्यामागून डोळ्यांत शिरणारा आणि तिथून सरळ खाली डिगरीच्या भेंडोळ्यावर ओघळणारा… तो थेंब घामाचा की अश्रूचा? ही भरती की ओहोटी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)