#अबाऊट टर्न: फॅण्टसी? 

– हिमांशू 
अनेक लेखक खरोखर दूरदृष्टीचे असतात. काळाच्या पुढचा विचार करून ते आजच्या काळातली “फॅण्टसी’ लिहितात. काही वर्षांनी ती “फॅण्टसी’ राहत नाही; वस्तुस्थिती बनते. भालचंद्र नेमाडेंच्या “कोसला’मध्ये दोन मित्र स्वतःला हजार वर्षांनंतरचे इतिहासकार समजून बडबड करीत राहायचे. वरवर पाहता तो त्यांचा “टाइमपास’ वाटतो; पण त्यात एक करुण विनोद लपलेला असतो. “पूर्वीच्या काळी इतरांना कळू नये, अशा गोष्टी लोक करीत असत,’ हे त्या बडबडीतलं वाक्‍य आज शब्दशः खरं ठरलंय. खिशात मोबाईल बाळगणाऱ्या माणसाकडे त्याच्या अशा गुप्त गोष्टी फारच कमी उरल्यात.
देशात उदारीकरणाची धोरणं येण्याच्या कितीतरी वर्षे आधी वामन पात्रीकर नावाच्या नाटककारानं “बाजारपेठ’ ही एकांकिका लिहिली होती. दुनिया ही एक मोठ्ठी बाजारपेठ असून, इथं काहीही विकत मिळतंय; भाड्यानं मिळतंय, अशी एकांकिकेची मध्यवर्ती कल्पना होती. मित्रांपासून मृत्यूपर्यंत सर्वकाही विकत मिळतंय, अशी कल्पना रंगवण्यात आली होती. आज आपण यातल्या अनेक कल्पना सत्यात उतरताना पाहतो आहोत. “आरएबीएफ’ म्हणजे “रेन्ट अ बॉयफ्रेन्ड’ ही अशीच एक कल्पना. मित्र किंवा मैत्रिण भाड्यानं मिळू शकेल, अशी योजना करून एक मोबाईल ऍप तयार करण्यात आलंय. राज्यातल्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली ही संकल्पना हळूहळू राज्यभर विस्तारण्याची शक्‍यता आहे.
तरुण वर्गातलं वाढतं नैराश्‍य लक्षात घेऊन हे ऍप मार्केटमध्ये आलंय. निराश व्यक्तीला एकटेपणा जाणवू नये, नैराश्‍यातून बाहेर पडता यावं, हा यामागचा उद्देश. उद्देश चांगलाच; पण ही गरज कुटुंबात, नात्यागोत्यात पूर्ण होऊ शकत नाही आणि नवी नाती निर्माण करण्याची भीती वाटते, या वास्तवातल्या वेदनादायी बाबी यामुळं अधिक ठळक होत नाहीत का? ऍपचं नाव आणि लोगो पाहून अनेकांना अनेक शंकाकुशंका येऊ शकतात. ऍपचा गैरवापर कशावरून होणार नाही, असा संशयही येऊ शकतो. परंतु तसा विचार करायचा नाही; अविश्‍वास दाखवायचा नाही, असं ठरवूनसुद्धा आश्‍चर्य आणि खेद या दोन भावना मनात येतच राहतात.
बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्ड ही भाड्यानं घेण्याची वस्तू व्हावी? माणसाचं वस्तूकरण झालंय हे खरं; पण इतकं? तासावर भाड्यानं घेतलेला हा मित्र किंवा मैत्रिण आपल्याला समजून घेणार, आपलं म्हणणं ऐकून घेणार, आपण एकटे नाही आहोत असं भासवत राहणार, आपलं नैराश्‍य दूर करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे अखेर अभिनयच करणार ना? ही कामं खरोखर मनापासून करणारे स्त्री-पुरुष भाडोत्री मित्र किंवा मैत्रीण व्हायला तयार होतील? किंबहुना समाजातल्या संवेदनशील व्यक्तींनी, इतरांना समजून घेण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनी अशी “सशुल्क सेवा’ द्यावी?
असं काही ऐकलं की गोंधळच गोंधळ होतात डोक्‍यात. “बाजारपेठ’ एकांकिकेत एका कवीला श्रोता मिळत नसतो. तो तासावर मित्र भाड्याने घेऊन त्याला कविता ऐकवत राहतो. न समजताही तो “मित्र’ दाद देत राहतो, असं चित्रण आहे. विनोद म्हणून, फॅण्टसी म्हणून ही दृश्‍यं चांगली वाटतात. मनोरंजन करता-करता अंतर्मुख करतात. पण जेव्हा असे प्रसंग वास्तवात समोर उभे राहतात, तेव्हा काहीच सुचेनासं होतं. कदाचित हे प्रसंगच खरे असावेत. जग हीच फॅण्टसी असावी!
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)