अबाऊट टर्न: प्रतीक्षा

हिमांशू

काही का असेना, जिथं नेहमी नऊ वीसची फास्ट ट्रेन, चारशे पन्नास नंबरची बस असे शब्द ऐकू येतात त्या मुंबापुरीतून जैवविविधता, पर्यावरणसंस्था वगैरे शब्द ऐकू येऊ लागलेत ही काहीशी धक्‍कादायक बाब असली तरी उत्साहवर्धकच आहे. अर्थात तेही स्वाभाविक आहे म्हणा! तिकडे ऍमेझॉनच्या जंगलात दोनशे ठिकाणी भयानक आगी लागल्या आणि “जगाचं फुफ्फुस जळतंय,’ असे शब्द माध्यमांमधून ऐकू येऊ लागले. जगाला आवश्‍यक असलेल्या वीस टक्‍के ऑक्‍सिजनचा पुरवठा एकट्या ऍमेझॉनच्या जंगलातून होतो, ही नवी माहिती या निमित्तानं इतरांप्रमाणेच मुंबईकरांनाही मिळाली. अशा स्थितीत मुंबईतली अडीच हजार झाडं एका झटक्‍यात तोडून टाकली तर काय होईल, ही चिंताही कुठे-कुठे दिसू लागली.

कमरेएवढ्या पाण्यातून चालण्याचा अनुभव नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात घेतल्यामुळं “विकास झाला म्हणजे नेमकं काय झालं,’ हा प्रश्‍नही हळूहळू पडू लागलाय. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मुंबईत उड्डाणपुलांची हवा होती. “सेतुनगरी’ असं मुंबापुरीचं वर्णन केलं जात होतं. ठिकठिकाणच्या उड्डाणपुलांची कामं एकदा पूर्ण झाली की आपण लवकर घरी पोहोचणार, असं मुंबईकरांना मनापासून वाटू लागलं. परंतु दुर्दैवानं तसं काही घडलं नाही. लोकसंख्या आणि वाहनांची संख्याच एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढत गेली की कितीही उपाययोजना केल्या, तरी त्या पुऱ्या पडेनाशा झाल्या. उलट वाहनं वाढल्यामुळं प्रदूषणही वाढत गेलं.

उड्डाणपुलांच्या पाठोपाठ सब-वे आणि नंतर मेट्रोचं आगमन झालं. दरम्यानच्या काळात लोकलची संख्याही बरीच वाढवली गेली. अर्थात तरीही जिवावर उदार होऊन लोंबकळत प्रवास करणं कमी झालं नाही. या प्रवासात मुंबईकरांची किती पाकिटं आणि मोबाइल चोरीला गेले, याचा हिशेब मांडला तर धडकी भरेल. परंतु तरीही मुंबईकर अत्यंत सकारात्मक विचार करणारे आहेत. अडचणीच्या प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचं “मुंबई स्पिरीट’ आपल्याला पाहायला मिळालं आहे. सर्वजण एकाच प्रकारच्या हालअपेष्टा सहन करीत असतात. त्यामुळं एकमेकांची गरज ते बरोबर जाणतात.

सार्वजनिक वाहतुकीची साधनं आणि रस्ते कधीतरी आपल्या गरजा पूर्ण करतील आणि आपले हाल थांबतील, अशी आशा मुंबईकरांनी बाळगणं स्वाभाविक आहे. आता मेट्रोचं जाळं संपूर्ण मुंबईत पसरलं की आपले सगळे प्रश्‍न सुटणारच, अशी खात्री मुंबईकरांना वाटते आहे. परंतु त्याच मेट्रोच्या कारशेडसाठी अडीच हजार झाडांची कत्तल होणं मुंबईकरांच्या मनात खुपतंय. पाहता-पाहता शहरातली मोकळी मैदानं संपत गेली. झाडांचा विचार केल्यास काही पडली आणि काही तोडली. अशा परिस्थितीत कारशेडसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं झाडं तुटणार, हे पाहून मुंबईकर हळहळलेत. त्यांचं म्हणणं एकच. मेट्रोही हवी आहे आणि झाडंही!

आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना हा राजकीय विषय बनणं स्वाभाविक आहे. परंतु मेट्रो कारशेड आरे परिसरातच करायची, हा निर्णय झालाच कसा, या प्रश्‍नाला अनेक पक्षांकडे उत्तर नाहीये. आता प्रकल्पावर बरेच पैसे खर्च झालेले असल्यामुळं तो दुसरीकडे स्थलांतरित केला तर खूप नुकसान होईल, असंही बोललं जातंय. त्यामुळं हा विषय किती दिवस “हॉट’ ठरणार याचीच चर्चा अधिक! बिचारी झाडं! गळ्यात नंबरप्लेट अडकवून वाट पाहात उभी!

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×