अबाऊट टर्न: पशुत्व!

हिमांशू

आपल्या आसपासचं समृद्ध प्राणिजीवन हाच सुबत्तेचा खरा पुरावा असतो, असं पर्यावरणवादी मानतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, असं केवळ पर्यावरणवादीच मानतात. बऱ्याच जणांना आपल्या भोवतालात कोणताही प्राणी नको असतो. मानवाची सुबत्ता हीच खरी सुबत्ता आहे आणि त्यासाठी पर्यावरणातील प्रत्येक घटकाचा बळी देण्यावाचून गत्यंतर नाही, अशी ठाम समजूत सर्वत्र पसरत चाललीय. किंबहुना निसर्ग आणि त्यातील मानवेतर पशुपक्षी यांचा बळी गेला तरच मानवी विकास शक्‍य आहे, असं मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. परंतु अशा मंडळींच्या दुर्दैवानं समृद्ध प्राणिजीवनच सुबत्तेचं निदर्शक असतं, हे वाक्‍य तंतोतंत खरं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वी लग्नासाठी मुलगी पाहायला मुलाकडची माणसं बैलगाडीतून जात असत. पुरुष मंडळी चर्चेत गुंतली की, मुलीच्या घरातल्या बायका मुख्य दरवाज्यातून बाहेर डोकावून पाहत असत. गाडीला जुंपलेले बैल जितके धष्टपुष्ट, तितकी मुलाच्या घरात सुबत्ता अधिक, असं मानलं जाई. तो काळ केव्हाच मागे पडलाय आणि आपल्या अंगणात हल्ली चिमण्यासुद्धा येत नाहीत, याची खंत न वाटण्याइतके आपण निर्ढावलो आहोत. एखाद्या माणसाला पशुपक्षी आवडतात, तर एखाद्याला ते आवडत नाहीत. आवडीनिवडीतला हा फरक समजून घेता येईल. परंतु आपलं संपूर्ण विश्‍व प्राणिविरहित होण्याच्या स्थिती2ची कल्पनाही सहन होणार नाही आणि तशी स्थिती मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी घातकही असेल.

प्राण्यांनी कधीही माणसाच्या जीवनात स्वतः हस्तक्षेप केलेला नाही. उलट, माणसानंच आपल्या हितासाठी काही प्राण्यांना पाळीव बनवलं. बैलांकडून शेती नांगरून घेतली, कुत्र्यांना घराच्या राखणीसाठी नेमलं, कोंबड्यांकडून अंडी मिळवून खाल्ली तर गाईम्हशींकडून दुधाची गरज पूर्ण केली. जंगली जनावरांनीही काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्कशीच्या माध्यमातून आपलं मनोरंजन केलं. उपयोगी पडणारे प्राणी कधी-कधी त्रासदायकही ठरू शकतात, हे मात्र आपण कधीच गृहित धरू शकलो नाही. काही माणसांना प्राण्यांचा तिटकारा असणं नैसर्गिक मानलं तरी निसर्गाचं चक्र पूर्ण करणाऱ्या या प्राण्यांना ठार मारण्याइतका हा तिरस्कार वाढू शकतो, हे मान्य करता येत नाही. मग ते प्राणी पाळीव असोत वा जंगली! पुण्यासारख्या शहराच्या एखाद्या भागात सात कुत्र्यांचा आणि 15 मांजरांचा एका पाठोपाठ एक मृत्यू होणं ही माणसांच्या दृष्टीनं फारशी मोठी बातमी नाही. परंतु या प्राण्यांवर विषप्रयोग झाला असण्याची शक्‍यता मात्र बातमीचा विषय ठरते. प्राण्यांचा तिरस्कार करणाऱ्यांप्रमाणंच प्राणिप्रेमीही या समाजात आहेत आणि त्यांना या घटनेविषयी संशय आहे. त्यांनी प्रकरण लावून धरलंय आणि मृत प्राण्यांचं शवविच्छेदनही करण्यात आलंय.

अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल आणि प्राण्यांविषयीच्या अमानवी तिरस्काराची कहाणी समोर येईल.
पुण्यातल्या कुत्र्या-मांजरांच्या मृत्यूप्रमाणंच औरंगाबादजवळच्या सुखना धरणात पाहुणे म्हणून आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे मृत्यूही सध्या चर्चेत आहेत. नदीपात्रात गाळपेराच्या शेतीला दिलेली परवानगी, त्यासाठी खतं-रसायनांचा वापर, आसपासच्या वीटभट्ट्या आणि रसायनमिश्रित पाणी धरणात सोडण्याची प्रवृत्ती फ्लेमिंगोंच्या मुळावर आली. प्राण्यांना क्षुल्लक, तिरस्करणीय मानणाऱ्यांसाठी
एक आठवण : काही वर्षांपूर्वी चीनमध्ये पिकं फस्त करणाऱ्या हजारो चिमण्या मारण्यात आल्या आणि त्यानंतर चिमण्यांचं भक्ष्य असलेल्या टोळांनी पिकं फस्त केली. तात्पर्य, कुणाचाही जन्म व्यर्थ नाही… प्राण्यांचाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)