अबाऊट टर्न: जळी-स्थळी

हिमांशू

टीव्हीवरच्या मालिका आम्ही फारशा पाहात नाही. त्या पाहिल्या म्हणून आमच्या मनावर विपरीत परिणाम होत नाही, त्याचप्रमाणं त्या पाहिल्या नाहीत तरी काही बिघडत नाही; परंतु मालिका न पाहण्याचं खरं कारण असं की, आम्हाला त्या समजत नाहीत. कधीतरी बातम्यांसाठी रिमोट आपल्या हाती मिळण्याची वाट पाहात आम्ही टीव्हीसमोर स्वस्थ बसतो, तेव्हा काही मालिका डोळ्यापुढून जातात, पण पडद्यावर नेमकं काय चाललंय, कळत नाही. कारण त्या मालिका आम्ही सलग बघितलेल्या नसतात. कोण कुणाचा नवरा आणि कोण कुणाची बायको, इथपासून आमच्या अज्ञानाला सुरुवात होते.

कधीतरी एखादा भाबडा प्रश्‍न तोंडातून जातो आणि घरातला महिलावर्ग आमची यथेच्छ अब्रू काढतो. गप्प बसून वाट पाहण्याला पर्याय नाही, हे ओळखून कधीकधी आम्ही डोळे मिटून फक्‍त ऐकत राहतो. क्रिकेटची मॅच हौसेनं पाहतो; परंतु आयपीएलच्या नादाला लागत नाही. आंतरराष्ट्रीय मॅच असेल तर किमान कोण कुणाविरुद्ध खेळतंय, हे तरी आम्हाला समजतं; परंतु आयपीएलचं रेकॉर्ड लक्षात ठेवायचं म्हणजे मालिका पाहून त्यातली पात्रं लक्षात ठेवण्यासारखंच आहे. शिवाय, सोनेरी रंगाची पॅड आणि हेल्मेट बघून ही मंडळी नुकतीच अलेक्‍झांडरच्या सैन्यातून आली असावीत, असा भास उगीचच आम्हाला होत राहतो.

सध्या टीव्हीला घरात बरीच मागणी असते आणि टीव्हीचा पडदा कितीही मोठा असला, तरी त्याचे दोन-तीन भाग करून प्रत्येक भागात वेगवेगळं चॅनेल पाहण्याची सोय अद्याप उपलब्ध झालेली नाही. निवडणुकीचं वातावरण तापत चालल्यामुळं आम्हाला बातम्या बघायची कोण घाई झालेली असते. परंतु घरातल्यांचं मन आयपीएल आणि मालिकांमध्ये अडकलेलं असतं. या मंडळींना निवडणुकीसारख्या महत्त्वपूर्ण इव्हेन्टचं काहीच पडलेलं नाही, असं वाटत असतानाच काल एक आचंबित करणारी माहिती समजली. टीव्हीवरच्या मालिका किंवा आयपीएल पाहणारेसुद्धा निवडणुकीच्या वातावरणापासून आपला बचाव करू शकत नाहीत, हे ऐकून आम्हाला प्रचंड आनंद झाला. काही मालिकांमध्ये म्हणे सरकारच्या योजनांची जाहिरात केली जातेय आणि विरोधी पक्षांनी त्याला आक्षेप घेतलाय. उज्ज्वला योजना, मेक इन इंडिया वगैरे शब्द मालिकांमधून ऐकायला मिळू लागल्यामुळं तिथंही वातावरण तापलंय. आम्हाला बातम्या पाहू न देणाऱ्या मंडळींना आम्ही यावरून भरपूर चिडवून घेतलं. म्हटलं आता ऐका, मालिकांमध्येही तेच सुरू झालंय. मालिकांमध्ये काम करणाऱ्यांच्या छोट्या मुलाखती आम्हाला ऑनलाइन वर्तमानपत्रांतूनही पाहायला मिळाल्या. लोकांच्या लाडक्‍या अभिनेत्रींनी याविषयी आपली बेधडक मतं मांडली होती. काही का असेना, प्रचाराचं पीक आता बायोपिकपर्यंत सीमित न राहता मालिकांमध्येही आलं, ते बरं झालं. राजकारणाला वैतागलेल्यांना लपायला जागा मिळता कामा नये. कान-डोळे रिकामे नकोतच.

आयपीएलची मॅच बघावी तर तिथंही असंच काहीतरी चाललंय असं समजलं. कुठलीशी मॅच सुरू असताना प्रेक्षकांमधून अचानक राजकीय घोषणा सुरू झाल्या. कदाचित इथून पुढच्या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी पक्षाच्या घोषणा दिल्या जातील. त्यानंतर स्टेडियमचे दोन भाग करून दोन पक्षांमध्ये घोषणांचा सामना रंगेल आणि क्रिकेटचा सामना निरर्थक ठरेल. मालिका आणि आयपीएल हे महत्त्वाचे किल्ले सर केल्यानंतर प्रचारासाठी कोणतं माध्यम उरलंय, असा क्रिएटिव्ह विचार आम्ही सध्या करतो आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.