#अबाऊट टर्न: चंद्रदर्शन 

– हिमांशू 
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. अत्यंत विकसित आणि तंत्रसमृद्ध शहर. नशीब काढण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात. मुंबई शेअर बाजरावरून देशाची आर्थिक तब्येत तपासली जाते. मुंबई धावली नसती तर देश ठप्प राहिला असता. मुंबई रात्रीसुद्धा जागी असते आणि जागी असतानाही स्वप्नं बघत असते! पण भाद्रपद पौर्णिमेला रात्री ही मुंबई काही काळ थांबली. खरं तर आदल्या दिवशी गणपतीबाप्पांना निरोप देण्यासाठी बराच वेळ मिरवणुका चालल्या होत्या. तो वेळ मुंबईला भरून काढायचा होता.
थांबून चालणार नव्हतं. तरीही मुंबई थांबली. म्हणजे, माणसं थांबली. घरातून बाहेर आली. रस्तोरस्ती जमली आणि आकाशाकडे पाहू लागली. (आकाश बघायचं असेल तर बहुतांश मुंबईकरांना बिल्डिंगमधून बाहेर यावं लागतं.) आकाशाकडे बघता-बघता मुंबईकरांचं भान हरपलं. वेगळाच चमत्कार दिसत होता. आकाशात चंद्र होता. पौर्णिमा होती म्हणजे पूर्णचंद्र असणारच. तो काही चमत्कार नव्हे. परंतु त्या चंद्रावरचा ससा गायब झाला होता. सशाच्या जागी साईबाबांचा चेहरा दिसत होता. “तुम्हाला दिसला का?’ या प्रश्‍नाला होकारार्थी उत्तरंच जास्त येत होती. कारण, जे खरे भक्त आहेत, त्यांनाच साईबाबा दिसतील, असं सांगितलं गेलं होतं.
एखाद्याला चंद्रावर नेहमीसारखा ससाच दिसला, तर तो अश्रद्ध ठरत होता. त्यामुळं बहुसंख्य लोकांनी चंद्रावर साईबाबांचा चेहरा दिसतोय, असं बिनदिक्कत सांगून टाकलं. त्यानिमित्तानं मुंबईकरांनी पौर्णिमेच्या पूर्णचंद्राचं देखणं रूप डोळे भरून पाहिलं, हे खूपच पॉझिटिव्ह झालं. धावणाऱ्या मुंबईकरांच्या खिशात अचानक थरथराट झाला आणि मोबाइलमध्ये एक मेसेज अलगद येऊन पडला. एक फोटो. फोटोत चंद्र. चंद्रावर साईबाबांचा धूसर चेहरा. फोटोखाली मजकूर… “चंद्रावर साईबाबा दिसत आहेत; परंतु खऱ्या भक्तांनाच ते दर्शन देत आहेत.’ त्यानंतरच रस्त्यांवर गर्दी जमली. लहानपणी खेळण्यासाठी चंद्र हवा म्हणून हट्ट धरणाऱ्या प्रभूरामचंद्रांचा हा देश.
रामरायांना कौसल्यामातेनं आरशात चंद्र दाखवला आणि त्यांचा हट्ट पुरवला. तिथून आमचा प्रवास सुरू झाला आणि आज आम्ही “चांद्रयान-2′ मोहीम कधी सुरू होते, याची वाट पाहत आहोत. सन 2022 मध्ये भारतीय अंतराळवीर अंतरिक्षात झेपावेल. चंद्राला अगदी जवळून पाहिल. त्याचं निरीक्षण आणि अभ्यास करेल. चंद्रावर वसाहती निर्माण करता येतात का, याची चाचपणी तर जगभरातून सुरू आहे. आपणही ती करणार आहोत. एक यान चंद्रावर उतरेल आणि दुसरं त्याभोवती प्रदक्षिणा घालत राहील. चंद्रावरचं यान प्रदक्षिणा घालणाऱ्या यानाच्या माध्यमातून चंद्राची माहिती पृथ्वीवर पाठवत राहील.
चंद्रावर भलेमोठे खड्डे आहेत आणि त्यामुळं जी नक्षी तयार झालीय, त्याचा आकार पृथ्वीवरून सशासारखा दिसतो, असं म्हणतात. एखाद्या जीनिअस माणसाला तो आकार वेगळाही दिसत असेल; पण तो सशासारखाच दिसतो, असं म्हणणं त्याची मजबुरी बनत असेल! एखाद्या दिवशी तो आकार साईबाबांच्या चेहऱ्यासारखा दिसतो, असं म्हटलं म्हणून काही बिघडत नाही. सांगितलेलं आपण किती ऐकतो, आपल्याला ते किती पटतं, याची कुणीतरी सतत चाचणी घेतंय… इतकंच!
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)